गंगापूर - राज्यातील ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवार, 2 जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत संपाला प्रारंभ होत असून सर्व ग्रामसेवक त्यांच्या ग्रामपंचायतींच्या चाव्या गटविकास अधिकार्यांकडे सुपूर्द करणार आहेत. या संपाला गंगापूर तालुक्यातील 9 ग्रामसेवकांनी विरोध दर्शवला असून जनतेला वेठीस धरणार्या या आंदोलनाला आपला पाठिंबा नसल्याचे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.
ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी 30 जूनपासून धरणे आंदोलनाने सुरुवात करण्यात आली. पुढील टप्प्यांत बुधवारपासून राज्यभरातील सर्व ग्रामसेवक त्यांच्या ग्रामपंचायतींच्या चाव्या त्या त्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांकडे सुपूर्द करणार आहेत. त्यानंतर सर्व ग्रामसेवक मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत.
या संपाला गंगापूर तालुक्यातील 9 ग्रामसेवकांनी विरोध दर्शवला असून जनतेला वेठीस धरणार्या या आंदोलनामुळे पावसाअभावी चिंतेत असलेल्या ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांमध्ये वाढ होऊन, शाळा महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना लागणार्या कागदपत्रांची गैरसोय होणार असल्यामुळे आमचा या आंदोलनाला विरोध असल्याचे या नऊ ग्रामसेवकांचे नेतृत्व करणारे संभाजी बनकर यांनी सांगितले. यासंबंधी गटविकास अधिकार्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.