आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या दहा मिनिटांत टोल‘फोड’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी, नांदेड आणि औरंगाबादेतील टोलनाक्यांवर आंदोलन करून सरकारविरोधी घोषणा दिल्या. बीड जिल्ह्यातील आष्टीजवळील टोलनाक्यावर अवघ्या दहा मिनिटांत नासधूस करून हल्लेखोर पसार झाले.

आष्टी गावाजवळील पांढरी येथे रोहन अँड राजदीप इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा टोलनाका आहे. सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास नंबर प्लेट झाकलेल्या टाटा सफारी वाहनातून सहा जण नाक्यावर उतरले. तोंडाला रुमाल बांधलेल्या युवकांनी कर्मचार्‍यांना आमचा टोलविरोधी कार्यक्रम सुरू असल्याचे सांगत तोडफोड सुरू केली. टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे, चार संगणक संच, प्रिंटरची तसेच कार्यालयाच्या काचा, खिडक्यांची तोडफोड करून संगणक संच, प्रिंटरवर डिझेल ओतून पेटवून दिले. दहा मिनिटांतच नासधूस, जाळपोळ करून हल्लेखोर पसार झाले.

सकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास टोलनाका व्यवस्थापक धनंजय नीळकंठ दामले यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या तोडफोड व जाळपोळीत सुमारे 72 हजार रुपयांचे नुकसान झाले. हल्लेखोरांनी कॅमेरे फोडल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास अडचणी येत आहेत. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत टोलनाका बंद होता. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सुनील कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले. यात सुमारे 72 हजार रुपयांचे नुकसान झाले.

लाडगावलाही तोडफोड
अज्ञात हल्लेखोरांनी लाडगाव (ता.जि. औरंगाबाद) टोलनाक्याचीही तोडफोड केली. दगडफेकीत संगणक फुटले आहे. अंदाजे 17 हजार रुपयांचे नुकसान झाले. अज्ञात हल्लेखोर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आले होते. या घटनेप्रकरणी करमाड पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

वेळीच माहिती दिली असती तर..
टोलनाक्यावर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जाळपोळ, तोडफोड झाली. परंतु आाम्हाला पहाटे सव्वापाचला माहिती देण्यात आली. कर्मचार्‍यांना कुठेही मारहाण झालेली नाही. वेळीच माहिती दिली असती तर नुकसान टळले असते. आरोपींना जागेवरच अटक करता आली असती. सुनील कुलकर्णी, प्रभारी पोलिस निरीक्षक, आष्टी.

मनसे पळपुटेपणा करणार नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पळपुटेपणा करणारी नाही. त्यामुळे तोंडाला फडके बांधणारे मनसे कार्यकर्ते नाहीत. अनोळखी आरोपींचा शोध घ्यावा. आम्ही टोलनाका बंदची मागणी सविनय करत आहोत. आतापर्यंत टोलनाक्यांवर लूट सुरू आहे. 2012 पर्यंत मुदत होती, ती पुढे कशी वाढली ? वैभव काकडे, बीड जिल्हा उपाध्यक्ष,

परभणी
परभणी-गंगाखेड रस्त्यावरील टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. नाक्याचे गेट मोकळे करून कार्यकर्त्यांनी कामगारांना पिटाळून लावले. आघाडी सरकारचा निषेध असो, अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

दगडापूर नाक्यावर कार्यकर्त्यांचे आंदोलन
बिलोली तालुक्यातील दगडापूर येथे सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण टोल कंपनीच्या नाक्याची तोडफोड केली. ऑडिटर शिवा हनमंतराव पाटील यांच्या तक्रारीवरून बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.