माजलगाव- माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे शनिवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणाऱ्या ३३ केेव्ही उपकेंद्राच्या उद्घाटनाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. उपकेंद्राचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने जर कोणी श्रेय लाटत असेल तर कार्यक्रम उधळून लावण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या कार्यकाळात माजलगाव तालुक्यातील एकूण ११ ठिकाणी ३३ केव्ही उपकेंद्रांना मंजुरी मिळाली होती. उपकेंद्राची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामांचे भूमिपूजनही पार पडले. त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत या कामांकडे कोणाचेच लक्ष राहिले नाही. आता अचानक प्रशासनाने १८ जून रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या उपकेंद्राच्या उद््घाटनाची पत्रिका सोशल मीडियावर टाकली आहे. अर्धवट अवस्थेतील पात्रुड उपकेंद्राच्या कामाच्या उद््घाटनावरच ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. ज्यांनी ही कामे खेचून आणली ते माजी मंत्री प्रकाश साेळंके यांच्यासह सरपंच, गावातील प्रतिष्ठितांची नावे उद््घाटन पत्रिकेत नाहीत. उर्वरित काम पूर्ण झाल्याशिवाय उद््घाटन होऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून उद््घाटन उधळण्याचा इशारा सरपंच नजीर कुरेशी, उपसरपंच घनश्याम भुतडा, डाॅ. मनसबदार यांनी दिला आहे.
पोलिस बळ तैनात करणार
पात्रुडयेथे शनिवारी ३३ केव्ही उपकेंद्राचे उद््घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार असल्याने शुक्रवारी सायंकाळी आम्ही कार्यक्रमस्थळाची पाहणी केली असून शनिवारी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक ए. बी. कदम यांनी सांगितले.