आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Majgaon Closed Against Attack On Bhoie Society People

भोई समाजाच्या वसतीवरील ठेकेदाराच्या हल्ल्याच्या निषेधार्थ माजलगाव शहर बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - भोई समाजाच्या वसतीवरील ठेकेदाराच्या गुंडांनी हल्ला केला. यात नऊ महिला व चार पुरुष जखमी झाले. हल्ला करणा-या गुंडाना त्वरित अटक करून खोटे अ‍ॅट्रॉसिटी गुन्हे रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी सोमवारी माजलगाव शहरात सर्वपक्षीय बंद करण्यात आला.

माजलगाव धरण हे मासेमारी करण्यासाठी खुले करावे या मागणीसाठी ठेकेदार व मच्छीमार यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद चालू असून मच्छीमार भोई समाजाने हे धरण खुले करावे या मागणीसाठी बीड, माजलगाव व धरणात मोठे आंदोलन केले होते. तेव्हापासून ठेकेदार व मच्छीमार यांच्यात वाद वाढत गेला. यातच शुक्रवारी ठेकेदार व त्यांच्या 50 ते 60 गुंडांनी धरणाजवळील भोई वस्तीवर हल्ला केला. यात नऊ महिला गंभीर जखमी झाल्या असून यात एका गरोदर महिलेच्या पोटात लाथाबुक्या मारल्याने तिचे बाळ पोटातच मरण पावले. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त झाला. यात ठेकेदार व त्याच्या गुंडांवर गुन्हेही दाखल झाले. परंतु प्रमुख आरोपी अद्यापही फरार असल्याने भोई समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

चार जुलै रोजी आव्हान संघटना व सर्वपक्षीय पदाधिका-यांनी शहर बंदचे आवाहन केले होते. सकाळी 11 वाजता संभाजी चौकातून शेकडो महिला व पुरुषांनी यात सहभाग घेतला. यात आव्हान संघटनेचे अध्यक्ष डॉ. उद्धव नाईकनवरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आर. टी. देशमुख, शिवसेनेचे सतीश सोळंके, अरुण राऊत, ज्ञानेश्वर मेंडके, मनसेचे रेख फड, भोई समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाबळे, कॉँग्रेसेचे नारायण होके यांच्यासह शेकडो पदाधिकारी बंदचे आवाहन करण्यात सहभागी झाले होते.तसेच शहरामध्ये फेरी काढून शांततेत बंदचे आवाहन करत मोर्चा निघाला असता पोलिसांनी ठाण्यासमोर नागरिकांना अडवले. त्यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला. जमावाने पोलिसांचे आदेश धुडकावत पुढे गेला तर काही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. बंदमुळे शहरातील व्यवहार, अनेक दुकाने दिवसभर बंद होती.
फोटो - भोई समाजाच्या महिलेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ माजलगाव बंद छाया : नीलेश होके