आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळेगावच्या जातपंचायतीत बलात्कार प्रकरणाचा निवाडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - माळेगाव यात्रेचे सूप वाजू लागले की, येथील तलावाच्या काठावर भरणा-या जात पंचायतीकडे सर्वांचे लक्ष वेधते. यावर्षी माळेगावच्या जातपंचायतीत एका बलात्कार प्रकरणात मुलीने पोलिसांत केलेली तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाल्याने मुलीच्या वडिलांना 41 हजार रुपये दंड ठोठावून तक्रार मागे घेण्याचे आदेश जातपंचायतीचे प्रमुख चंदर दासरजोगी यांनी दिले.या जातपंचायतीत अन्य नऊ प्रकरणे होती. ही सर्व प्रकरणे या यात्रेत निकाली काढण्यात आली आहेत. स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, वैदू समाज संघटनेला मान्यता, गावोगाव पंचाची निवड यासह अन्य बाबींची चर्चा होऊन मान्यता देण्यात आली.

माळेगाव येथील जातपंचायतीचे भटक्या जमातीत मोठे महत्त्व आहे. मढी (जि.नगर) येथील जातपंचायतीनंतर दुसरी महत्त्वाची जातपंचायत येथे भरते. माळेगाव यात्रा ओसरू लागली की तलावाच्या काठावर गोलाकार बसून जातपंचायतीला प्रारंभ होतो. सर्वांच्यापुढे पैरवीकार काठ्या घेऊन बसतात व सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. या वेळच्या जातपंचायतीत खंबाळा (ता.जि.हिंगोली) येथील बलात्काराचे एकमेव मोठे प्रकरण होते. या प्रकरणात एका मुलीने गावातीलच एका मुलावर बलात्काराचा आरोप करून पोलिसात गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण जातपंचायतीत आल्यानंतर पंचांनी चर्चा केली, तपास करून साक्षीदार तपासले, त्यात या आरोपात तथ्य नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे जातपंचायतीचे प्रमुख न्यायाधीश चंदर दासरजोगी
यांनी मुलीच्या वडिलांना 41 हजार रुपये दंड ठोठावला व पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्याचा आदेश दिला.