आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालोजी राजे भोसले स्मारकासाठी रस्ता देण्यास विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ- मालोजी राजे भोसले स्मारकाच्या विकासाकरिता वाढीव जागा मिळावी म्हणून छावा संघटनेने चारशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक 17 पिठे असलेल्या लक्षविनायकाच्या रस्त्यास वळण देऊन तो मार्ग बदलावा या मागणीवर वेरूळ ग्रामस्थ व छावा संघटनेचे पदाधिकारी यांच्यात तहसीलदार अनिता भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी संयुक्त बैठक घेण्यात आली. शिवाय स्थळ पाहणीदेखील करण्यात आली. मात्र, स्मारकासाठी मंदिराचा रस्ता देण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला.
वेरूळ येथील मालोजी राजे भोसले स्मारकावर शासनाने लाखो रुपये खचरून वृक्षारोपणासह बांधकाम पाण्याचे हौद यासह अनेक विकासकामे केली; परंतु अल्पावधीतच येथे केलेले बांधकाम ढासळण्यास सुरुवात झाली असून परिसरात सर्वत्र काटेरी झुडुपे उगवली आहेत. त्यात आता पुन्हा या ठिकाणी सोलर लाइट, कारंजे यासह अन्य विकासकामांसाठी जवळपास 75 लाख रुपये नव्याने मंजूर झाल्याने छावा संघटनेने आता आणखी वाढीव जागेवर विकास करायचा असल्याचे सांगत ऐतिहासिक गणपती मंदिराच्या रस्त्याची जागा ताब्यात मिळावी व मंदिरास पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती.
या अनुषंगाने मंगळवारी बैठक घेण्यात आली; परंतु ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी स्मारकाची दैना पाहता आधी आहे त्या निधीत स्मारकाचा विकास करा, नंतरच पर्यायी रस्ता उपलब्ध करू, अशी भूमिका घेत रस्त्याची जागा स्मारकास देण्यास विरोध केला. या वेळी बैठकीस माजी ग्रामपंचायत सदस्य नाना ठाकरे, माजी सरपंच प्रकाश पाटील, सदस्य इम्रान पठाण, सतीश फुलारे, बब्बूभाई शेख, राष्ट्रवादीचे मिलिंद पाटील, छावाचे किशोर चव्हाण, पोलिस पाटील रमेश ढिवरे, तलाठी लक्ष्मण जाधव आदींची उपस्थिती होती.
गावाचा विचार करावा
आमचा विकासकामास विरोध नसून स्मारकाची परिस्थिती पाहता आधी त्याचा विकास करावा. मगच मंदिराच्या रस्त्याचा पर्यायी विचार करू, सध्या रस्त्याचा वापर लक्षविनायक गणपती मंदिरासह, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी करण्यात येत असल्याने असा तडकाफडकी निर्णय घेणे शक्य नाही. संपूर्ण गावाचा विचार करणे गरजेचे आहे. नाना ठाकरे, माजी ग्रा.पं.सदस्य