आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीसाठी ६०० रुपये, सिमकार्ड खरेदी करून शेकडो बेरोजगारांची फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना / सोयगावदेवी - ‘कामासाठी मुले पाहिजेत’ असे म्हणून ६०० रुपये, महत्त्वाची कागदपत्रे मागवून त्याद्वारे सिमकार्ड खरेदी करून बेरोजगार युवकांना गंडवणाऱ्या आरोपीला सापळा रचून पकडण्यात आले. औरंगाबादमधील हर्सूल टी पॉइंटवर मंगळवारी दुपारी ३ वाजता पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत फसवेगिरी करणाऱ्या शेख अजीम शेख रफिक (२५) यास अशाच प्रकरणातील ५० ते ६० फोन आले. मराठवाड्यातील शेकडो युवकांना शेख अजीमने गंडा घातला असून त्याची पत्नी रेश्मासुद्धा सामील असल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे.

शेख अजीम शेख रफिक हा सिल्लोडमधील जयनुद्दीन कॉलनीतील रहिवासी अाहे. योगेश नाना राऊत (२३) व अमोल सुखदेव सहाने (दोघे रा. सोयगावदेवी, ता.भोकरदन, जि. जालना) या दोघांची फसवणूक झाल्यावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. भोकरदन येथील संगीता कृषी केंद्राचे संचालक पंढरीनाथ खरात यांना दीड महिन्यांपूर्वी २३ मे रोजी दूरध्वनी आला. समृद्धी बायोटेक कंपनीतून बोलत असल्याचे सांगून कंपनीच्या कामासाठी मुले पाहिजेत, असा सांगितले. यानंतर खरात यांनी नोकरीची गरज असलेल्या योगेशाला सदर कामाबाबत कल्पना देऊन तो मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर योगेशने मोबाइलद्वारे संपर्क केला. समोरून मी पवार साहेब बोलतो, असे म्हणत फोटो, दहावीचे मार्कशीट, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड अशी शैक्षणिक व ओळखपत्रासंबंधीची कागदपत्रे बसमध्ये पाठवा, असे सांगितले. दहा ते बारा हजार रुपये पगार, कंपनीचे सिमकार्ड, ड्रेस, पेट्रोल अलाउन्स देण्यात येईल, असेही म्हटले. यानुसार दुसऱ्या दिवशी योगेशने शैक्षणिक, ओळखपत्रासंबंधी कागदपत्रे व ६०० रुपये एका लिफाफ्यात टाकून औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसचालकाकडे दिले. काही वेळाने फोन करून पवार यांना लिफाफा पाठवल्याबाबत कळवले असता त्याने पुढील सोमवारी (३० मे रोजी) चिकलठाणा एमआयडीसी येथे मुलाखत घेण्यात येईल. यानुसार याेगेशने सोमवारी चिकलठाणा एमआयडीसीत पोहोचून पवार यांच्याशी संपर्क केला असता १५ मिनिटात येतो, असे कळवले. मात्र, पवार नावाचा माणूस दिवसभर तेथे आलाच नाही. पुन्हा फोन केला असता मोबाइल बंद दिसून आला. दरम्यान, ३ जून रोजी सोयगावदेवी गावातीलच अमोल सुखदेव सहाने यास समृद्धी बायोटेक कंपनीतून फोन आला व आणखी एक मुलगा कामासाठी पाहिजे, असे सांगण्यात आले. त्यानंतर अमोलने दोघा मित्रांना ही माहिती देऊन त्यांचीसुद्धा कागदपत्रे औरंगाबादला जाणाऱ्या बसमध्ये दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाठवली. सायंकाळनंतर उशिरा पुन्हा एक मुलगा पाहिजे म्हणून फोन आला. त्यानंतर अमाेलने ही माहिती योगेशला दिली व समृद्धी बायोटेक कंपनीतील काम असून कागदपत्रेही मागितली. मात्र, या वेळी संशय आल्याने योगेशने भोकरदन येथील पत्रकार फकिरा देशमुख यांना हे प्रकरण सविस्तर सांगितले. याप्रकरणी योगेश राऊत यांच्या तक्रारीवरून औरंगाबादेतील शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

नकली लिफाफा पाठवला
त्या व्यक्तीला पकडण्यासाठी तीन युवकांनी युक्ती लढवली. त्यांनी ही माहिती औरंगाबादचे सहायक पोलिस आयुक्त शेवगण यांना दिली. शेवगण यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता सापळा रचून पवारला पकडण्याचे ठरवले. अमोल सहाने यास औरंगाबादकडे जाणाऱ्या बस (एमएच २० बीएल २०६३) मध्ये नकली लिफाफा करून पाठवण्याचे सांगण्यात आले. योगेश व अमोल यांनी एक लिफाफा तयार करून बसचालकाकडे दिला, तर यातील अमोल हा स्वत: बसमध्ये बसून गेला होता. शिताफीने आरोपीला पकडले.

पाठलाग करून हर्सूल टी पाॅइंटवर पकडले
मंगळवारी दुपारी ३ वाजता हर्सूल टी पाॅइंट येथे बस (एमएच २० बीएल २०६३) आली. या वेळी एका अनोळखी व्यक्तीने (आरोपी शेख अजीम शेख रफिक) बसचालकाकडून नकली लिफाफा घेतला. त्यानंतर योगेश राऊत याने शहरातील एका नातेवाइकाच्या पत्त्याची विचारपूस केली. तसेच त्याच्याकडील फोन घेऊन शिताफीने मध्यवर्ती बसस्थानक येथे तैनात असलेल्या पोलिस उपनिरीक्षक बिरारी यांना संपर्क करून हर्सूल टी पॉइंटवर बोलावून घेतले. या वेळी योगेशसोबत अमोल व कैलास हेसुद्धा असल्याने शेख अजीम घाबरला व त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगेश व त्याच्या दोन मित्रांनी अर्धा किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्याला पकडले. तोपर्यंत पोलिस उपनिरीक्षक बिरारी व पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले व शेख अजीमला ताब्यात घेतले.

मराठवाड्यातील शेकडो युवकांना गंडा
पोलिसी खाक्या दाखवल्यावर शेख अजीमने यापूर्वी शेकडो युवकांना नोकरीचे अामिष दाखवून फसवल्याची कबुली दिली. यात युवकांकडून महत्त्वाची कागदपत्रे मागवून त्याआधारे सिमकार्ड खरेदी करून त्या क्रमांकावरून दुसऱ्या मुलांना फोन करून याच पद्धतीने फसवत असे. आतापर्यंत मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना, हिंगोली, बीडसह विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील युवकांना अजीमने आपल्या जाळ्यात ओढलेले आहे. त्याच्या सोबतीला पत्नी रेश्मा ऊर्फ गुड्डीसुद्धा नोकरीबाबत खात्री देत असे.
कृषी सेवा केंद्रचालकांची मदत
कृषी सेवा केंद्रचालकांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांनाच कामासाठी मुले पाहिजेत, असे सांगितले जायचे. शिवाय जर कुणी इच्छुक असेल तर त्याची कागदपत्रे व रोख ६०० रुपये औरंगाबादला पाठवा, असे सांगितले जायचे. मुलाखतीसाठी बोलावल्यावर जुना क्रमांक बदलून पुन्हा नवीन कागदपत्राआधारे सिमकार्ड खरेदी करून दुसऱ्या मुलांना याच पद्धतीने गंडा घालण्याचा धंदा शेख अजीम व त्याची पत्नी रेश्मा ऊर्फ गुड्डी करत होती.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...