आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त; पतीला ७ वर्षे सक्तमजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांनी दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा शनिवारी सुनावली.

धारूर येथील विलास दशरथ इंगळे याचा विवाह मीनाक्षीशी २९ मे २०११ रोजी झाला होता. विवाहानंतर आठ दिवसांनी मीनाक्षी माहेरी गेल्यानंतर पती विलास इंगळे याने हुंड्यातील शिल्लक दहा हजार रुपये माहेरहून घेऊन ये, अशी चिठ्ठी तिला लिहून दिली. पतीच्या दबावामुळे मीनाक्षीने माहेराहून दहा हजार आणून विलासला दिले. यानंतरही विलासने मला तू आवडत नाहीस, मी आता दुसरे लग्न करणार आहे, असा बहाणा करून कार घेण्यासाठी आईवडिलांकडून ५० हजार रुपये घेऊन येण्यासाठी धमकावले. तेव्हा मीनाक्षीच्या वडिलांनी पन्नास हजार रुपये विलासला दिले. यानंतर २८ फेब्रुवारी २०१२ रोजी विलासने सासरे उत्तम गिरगावकर यांना फोन करून मीनाक्षीला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगितले. त्यानंतर मीनाक्षीचे वडील धारूर रुग्णालयात तिला भेटण्यासाठी आले तेव्हा मीनाक्षी मृतावस्थेत दिसून आली. तिचा गळा आवळल्याची खून त्यांना दिसली. अधिक चौकशीअंती मीनाक्षीने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांना कळाले. दरम्यान, या प्रकरणी धारूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पती विलास दशरथ इंगळेसह सासरा दशरथ इंगळे, सासू सुमनबाई इंगळे, गयाबाई बोरकर, मामेसासरे अरुण बोरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. मीनाक्षीचा सासरा, सासू, मामेसासरा यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
विविध कलमांन्वये सक्तमजुरी अशी
न्यायाधीश मा. एम. व्ही. मोराळे यांनी विलास इंगळे याला कलम ४९८ अ प्रमाणे दोषी ठरवत ३ वर्षे सक्तमजुरी व २ हजार दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद. कलम ३०६ अन्वये ७ वर्षांची सक्तमजुरी व २ हजार दंड, तर कलम ३०४ ब मध्ये ७ वर्षे सक्तमजुरी व २ हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...