आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलींची सुरक्षितता धोक्यात, मानव विकास मिशनच्या बसमध्ये उपर्‍या प्रवाशांची घुसखोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - मागास भागातील मुलींना तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालयांमध्ये ने-आण करण्यासाठी मानव विकास मिशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बसगाड्यांमध्ये उपर्‍या प्रवाशांचाच भरणा होत आहे. त्यामुळे मुख्य लाभार्थी असलेल्या विद्यार्थिनींना बसमध्ये उभे राहून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
(बीड जिल्ह्यात खड्डयामुळे बसमध्येच प्रसूती; बाळ दगावले)
जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ आणि सेनगाव या तीन तालुक्यांना मानव विकास मिशनमधून प्रत्येकी पाच अशा एकूण 15 बसगाड्या देण्यात आल्या आहेत. या बसगाड्यांमधून ग्रामीण भागातील मुली तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी प्रवास करतात. सायंकाळी याच बसगाड्यांमधून पुन्हा गावी पोहोचतात. या बसच्या फेर्‍या मुख्यत्वे विद्यार्थिंनींच्या प्रवासासाठी आहेत, परंतु वाहक आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे मानव विकासच्या बसमध्ये मुलांना जागा मिळेनाशी झाली आहे. चढाओढ करून इतर प्रवासी बसमध्ये घुसून जागा व्यापत आहेत. यामुळे विद्यार्थिंनींना उभे राहावे लागत आहे. शनिवारी सायंकाळी हिंगोली बसस्थानकामधून सिरसम भागात निघालेल्या बसमध्ये मुली उभ्या, तर इतर प्रवासी खुच्र्यांवर बसले होते.

वाहकाला जाब विचारला
विद्यार्थिनींना ताटकळत उभे ठेवून अन्य प्रवाशांनी खुच्र्यांचा ताबा घेणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत इतरत्र फेर्‍या मारू नयेत आणि बसमध्ये केवळ विद्यार्थिनींनाच बसू द्यावे, याबाबत आगारप्रमुखांना लेखी सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही असे प्रकार घडत असतील तर ही बाब गंभीर आहे. याबाबत हिंगोली आगारप्रमुखांच्या माध्यमातून वाहकाला जाब विचारण्यात आला आहे. मानव विकास आयुक्तांनाही कळवणार आहोत. एम. एन. राऊत, जिल्हा समन्वयक, मानव विकास मिशन

नेहमीचीच बोंब
बसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच अन्य प्रवासी रुमाल वा इतर सामान सीटवर टाकून आपापल्या जागा आरक्षित करतात. त्यामुळे विद्यार्थिनींना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. ही बाब केवळ एका दिवसाची नाही, तर मुलींना नेहमीच या प्रकारांचा सामना करावा लागतो. एक महिन्यापूर्वी एका वाहकाने इतर प्रवाशांना उभे करून मुलींना जागा मोकळी केली होती, परंतु त्यानंतर झालेल्या वादामुळे वाहक कानाडोळा करत आहे. पौर्णिमा वाघमारे, पारडा, हिंगोलीत ये-जा करणारी विद्यार्थिनी.

बसमध्ये प्रवेश मिळवताना कसरत : मानव विकास मिशनच्या बसमधून जिल्ह्यात सुमारे 3 हजार मुली प्रवास करतात. 15 बसमधून त्या दररोज ये-जा करत असतात. या बसमध्ये इतर प्रवाशांची घुसखोरी होत आहे. परिणामी मुलींना दाटीवाटीने प्रवास करावा लागतो; शिवाय बसमध्ये प्रवेश मिळवताना कमालीची कसरत करावी लागते.

छायाचित्र : हिंगोली येथील बसस्थानकात उभ्या असलेल्या मानव विकासच्या बसमध्ये इतर प्रवाशांनी जागा बळकावल्याने विद्यार्थिनींना उभे राहून प्रवास करण्याची वेळ आली.