आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरला चार वेळा पाणी पुरेल इतका मांजरात साठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - गेल्या आठवडाभरापासून कमीअधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील मांजरा धरणात ३.०२३ दलघमी पाणीसाठा झाला आहे. हा जलसाठा अद्यापही जोत्याखालीच असला तरी उपलब्ध झालेले पाणी लातूरसाठी चार वेळा देता येणे शक्य आहे.

पर्जन्यमानाच्या हंगामातील चौथा महिना निम्म्यात आला असला तरी लातूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलस्रोत कोरडेठाक आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. लातूर महानगरपालिकेने तर २२ दिवसांतून एकदा शहराला पाणी देण्याचे नियोजन केले आहे. तेही अल्पकाळासाठीच असल्याने पुढील महिन्यापासून लातूरकरांना पाणी द्यायचे तर कोठून, हा प्रश्न प्रशासनाला भेडसावत आहे. अशा परिस्थितीत अल्प झालेला पाणीसाठाही काही काळ लातूरकरांची तहान भागवू शकणारा असल्याने दिलासादायक आहे. पंधरा दिवसांतून चार वेळा पाणीपुरवठा केल्यास पुढील दोन महिने लातूरकरांना हे पाणी पुरेल. परंतु उपलब्ध झालेला हा जलसाठा अतिशय काटकसरीने आणि शेतीला न देता वापरणे हेही तितकेच मोलाचे आहे.

लातूर जिल्ह्यात तीन सप्टेंबरपासून कधी हलका, तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सरासरीत आठवडाभरात ७० मिमीने वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण २९५.६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी ८०२ मिमी पाऊस पडत असल्याने ही टक्केवारी अवघी ३६.८६ इतकी झाली आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची िचंता कायम असून हंगामाच्या उर्वरित काळात जोरदार पाऊस होणे अत्यंत आवश्यक आहे.

धरण क्षेत्रात हवा जोमदार पाऊस
लातूर शहराला मांजरा, तर जिल्ह्यातील निलंगा, औसा तालुक्यांतील गावांना उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा धरणातून पिण्याचे पाणी दिले जाते. त्यामुळे या दोन्ही धरणांत जलसाठा होण्यासाठी बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत पाऊस होणे आवश्यक आहे. आठवडाभरात या दोन्ही जिल्ह्यांत लातूरसारखाच पाऊस झाल्याने काहीअंशी पाणीसाठा वाढला आहे. तेरणा धरणात ५.१०२ दलघमी पाणी साठा झाला, परंतु तोही जोत्याखालीच आहे.

रेणा धरणात ११ टक्के साठा
लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी सात प्रकल्पांची पाणीपातळी अद्यापही जोत्याखालीच असल्याने पाणीसंकट कायम आहे. रेणापूर तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने रेणा प्रकल्पात क्षमतेच्या ११ टक्के जलसाठा झाला आहे.

२४ तासांत १९ मिमी पाऊस
गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत लातूर जिल्ह्यात सरासरी १९.६५ िममी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण सरासरी २९५.६३ इतकी झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस असा
लातूर-२८५.८८, औसा- २७२.७६, रेणापूर- ३८२, उदगीर-२३६.१९, अहमदपूर-२६८.६५, चाकूर- २८५.८ जळकोट-३४२-५, निलंगा- २८६.९, देवणी-३६१.६३ तर शिरूर अनंतपाळ तालुक्यात २३४.९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.