कळंब/ शिराढोण - रायगव्हाण हा कळंब तालुक्यातील एकमेव मध्यम प्रकल्प आहे. यावर तालुक्यातील शेतकर्यांची मदार आहे, परंतु या प्रकल्पात मागील ३ वर्षांपासून पाणीच आले नाही. परिणामी शेतकर्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाणी रायगव्हाण प्रकल्पात आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी दिली. कळंब, वाशी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांची रावते यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सकाळी लातूर जिल्ह्यात दौरा करून त्यानंतर उस्मानाबादमधील कळंब, वाशी परिसरात दुष्काळी स्थितीची पाहणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळामध्ये रावते यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम, आमदार शांताराम मोरे, कृष्णा घोडा, प्रवक्ते आमदार विजय शिवतारे, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा समावेश होता. पाहणीदरम्यान जिल्ह्यातील आमदार ज्ञानराज चौगुले, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे, तालुकाप्रमुख रामलिंग आवाड, युवा सेनेचे बालाजी जाधवर उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. या वर्षीही दुष्काळी स्थिती असून शेतकर्यांची विचारपूस करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे आमदार मराठवाड्यात दाखल झाले आहेत. रावते यांच्यासह शिष्टमंडळ उस्मानाबादच्या दौर्यावर आले होते. शिराढोण परिसरात नायगाव, पिंपरी या गावांना भेटी देऊन त्यानंतर शिष्टमंडळाने रायगव्हाण प्रकल्पाला भेट दिली.
शेतकरी कुटुंबीयांना ५० हजारांची मदत
आठ दिवसांपासून जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्यांचे लोण पसरले आहे. चार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वाशी तालुक्यातील मांडवा येथे आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबीयांची सोमवारी भेट घेतली. चत्रभुज शिवाजी पांढरे यांनी नापिकीला कंटाळून आठ दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली असून त्यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन शिष्टमंडळाने पक्षाच्या वतीने ५० हजार रुपयांची मदत दिली.
यांच्या शेताची पाहणी
कळंब तालुक्यातील नायगाव येथील लिंबराज शितोळे यांची डाळिंबाची बाग करपून गेली, तर ज्वारीही उगवली नाही. तसेच पिंपरीच्या (शि.) पाडे या शेतकर्याचे पीक करपून गेले. या दोन्ही ठिकाणची पाहणी शिष्टमंडळाने केली.