आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीपुरवठा सचिवांच्या उपस्थितीत पाण्यावर झाला खल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यामुळे त्यावर ठोस उपाययोजनांसाठी पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांच्या उपस्थितीत दिवसभर खल झाला. राजेशकुमार यांनी धनेगावचे मांजरा धरण, भंडारवाडी मध्यम प्रकल्प, नागझरी बंधारा, हरंगूळ बूस्टर, वरवंटी बूस्टर, आर्वी बूस्टरची पाहणी केली. रेल्वेने पाणी आणल्यास ते कोठे उतरून घ्यायचे आणि त्याचा कसा पुरवठा करायचा, यावरही चर्चा करण्यात आली.

लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या महिन्यात केवळ एक वेळ पाणी सोडता येईल इतकाच पाणीसाठा मांजरा धरणात आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर दौर्‍यात आठवडाभरात लातूरसाठी कोठून पाणी आणायचे हे निश्चित केले जाईल, असे सांगितले होते. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनीही या प्रश्नात विशेष लक्ष घातले आहे. मात्र, महिनाभरापासून रेल्वेने पाणी आणण्याची केवळ चर्चाच सुरू आहे. त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेला नसल्याची माहिती आहे.

शासनाकडे प्रस्तावच आलेला नसल्यामुळे साहजिकच त्यावर कार्यवाही झालेली नाही. तसेच उजनी धरणातील पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे लातूरला रेल्वेने पाणी आणायचे आहे की एखादा मोठा पाऊस पडेपर्यंत वेळ काढण्याचे धोरण शासन राबवत आहे, अशी चर्चा सुरू होती. मात्र, लातूर दौर्‍यावर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांना लातूरला पाठवून अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी लातूरला आल्यानंतर राजेशकुमारांनी सकाळच्या सत्रात पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली. जिल्हाधिकार्‍यांकडून सगळी माहिती ऐकून घेतल्यानंतर आणि प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर त्यांनी स्थळ पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लातूरला पाणीपुरवठा केला जाणार्‍या मांजरा धरणातील पाण्याची पाहणी त्यांनी केली. तसेच पर्यायी व्यवस्था असलेल्या भंडारवाडी प्रकल्पालाही त्यांनी भेट दिली.

मांजरात वाढले एक फूट पाणी
उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे मांजरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले. मांजरा धरणाच्या वर असलेल्या किमान सात कोल्हापुरी बंधार्‍याद्वारे आणि रस्त्यातील विविध खड्डे बुजवत मंगळवारी पहाटेपर्यंत मांजरा धरणात पाणी आले. सकाळपर्यंत धरणातील पाणीपातळी एक फुटाने वाढली. धरणात पूर्वी १.२६ दशलक्ष घनमीटर पाणी होते. मंगळवारी त्यामध्ये ०.४ दशलक्ष घनमीटरची वाढ झाली.

रेल्वेचे पाणी महागडे
राजेशकुमार यांनी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याच्या विषयाने गांभीर्याने चर्चा केली. तसेच रेल्वेने पाणी आणलेच, तर ते कोठे रिते करायचे, कसे करायचे आणि तेथून कसा पुरवठा करायचा या स्थळांचीही त्यांनी पाहणी केली. नव्या माहितीनुसार लातूर शहराला १०७ किलोमीटर अंतरावरील पंढरपूर बंधार्‍यातून पाणी आणावे लागेल. पेट्रोल-डिझेल किंवा ऑइलसाठीच्या वॅगन धुऊन त्यातून पाणी आणता येईल. एका वॅगनमध्ये २६ लाख लिटर पाणी आणता येईल, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यासाठी रेल्वेला प्रतिदिन सुमारे ७ लाख रुपये द्यावे लागतील. त्यामुळे हे पाणी अत्यंत महागडे ठरणार आहे. एकावेळी पन्नास वॅगनमधून पाणी आणता येणार आहे.