आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjara Sugar Factory Election Deshmukh Panel Win

मांजरा साखर कारखाना पुन्हा देशमुख कुटुंबाच्या ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - विकास,रेणा कारखान्यांप्रमाणेच जिल्ह्यातील सहकाराचा केंद्रबिंदू असलेल्या मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख या काका-पुतण्याच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या कारखान्यासाठी शनिवारी मतदान झाले होते.

दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी स्थापना केलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीत देशमुख काका-पुतण्याच्या विलासराव देशमुख सहकार पॅनलचे सगळे उमेदवार हजारांवर मते मिळवत विजयी झाले. या निवडणुकीत भाजपच्या बळवंत जाधव, राजेश कराड यांनी एकत्र येऊन पॅनल उभे केले होते. राज्य आणि केंद्रात सत्ताबदल झाल्यामुळे मतदार काही तरी चमत्कार करतील आणि आपल्याला यश मिळेल, अशी खात्री त्यांना होती. मात्र, मतदारांनी त्यांचे डिपॉझिट जप्त केले. या पॅनलच्या उमेदवारांना साडेआठशे मतेही मिळवता आली नाहीत. त्यामुळे विकास आणि रेणाप्रमाणेच मांजराचा ऊस उत्पादक शेतकरी मतदार देशमुखांच्याच पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच विलासराव देशमुख सहकार पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत ती निर्णायक असल्याचे स्पष्ट झाले. केवळ औपचारिक घोषणा होण्यासाठी कार्यकर्त्यांनी सायंकाळपर्यंत वाट पाहिली.

उमेदवारानेचबजावला नाही मतदानाचा हक्क? - मांजराकारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, भाजपच्या रमेश कराड यांचे बंधू राजेश कराड आणि बळवंत जाधव यांनी लोकशाही जिवंत राहावी यासाठी निवडणुकीत पॅनल उभे करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पॅनल उभे राहिले. मात्र, पॅनलचे एक प्रमुख पदाधिकारी असलेल्या राजेश कराड यांनी या निवडणुकीत मतदानच केले नाही, असे त्यांच्या विरोधातील देशमुख पॅनलचे विजयी उमेदवार व्यंकट कराड यांनी सांगितले. याबाबत राजेश कराड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. त्यांचे मतदान झाले की नाही याबाबत निवडणूक निर्णय अधिकारीही ठोस काही सांगू शकले नाहीत.

विजयी उमेदवार
धनंजय देशमुख, रावसाहेब मुळे, पांडुरंग सूर्यवंशी, तात्यासाहेब देशमुख, प्रताप पडिले, अतुल पाटील, वसंत उफाडे, अरुण कापरे, अशोक काळे, व्यंकट कदम, आ. अमित देशमुख, जगदीश बावणे, चांदपाशा अन्सारी, श्रीशैल्य उटगे, सदाशिव कदम, व्यंकट कराड, श्रीहरी चामले, अनिल दरकसे. माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख, मंगल पाटील उज्ज्वला कदम.