आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजरा साखर कारखान्याला विलासराव देशमुख यांचे नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- राज्यासह देशातील सहकारी साखर कारखानदारीत मैलाचा दगड ठरलेल्या मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला. हा नामविस्तार सोहळा दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी माजी मंत्री आणि कारखान्याचे चेअरमन आमदार दिलीपराव देशमुख यांनी शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी मांजरा परिवार प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची ग्वाही दिली.

मांजरा कारखान्याला आता ‘विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना’ असे नाव देण्यात आले आहे. या वेळी कारखाना स्थळावर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती स्मृतिस्थळाचे भूमिपूजन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अलोट गर्दीत पार पडलेल्या या नामविस्तार सोहळ्याला आमदार अमित देशमुख, आमदार त्र्यंबक भिसे, अदिती देशमुख, धीरज देशमुख, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, महापौर अख्तर शेख, कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्यउटगे आदी उपस्थित होते.
मांजरा परिवारातील साखर कारखाने शेतकरी सभासदांच्या दैनंदिन जीवनातील एक सहकारी या नात्याने कार्यरत असल्याचे सांगत दिलीपराव म्हणाले, मांजरा कारखान्याचे नाव आता ‘विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना’ असे करण्यात आल्याने सभासदांची नामविस्ताराची इच्छा पूर्ण झाली आहे.
संग्रहालय उभारणार
आमदार अमित देशमुख म्हणाले, विलासरावांच्या स्मृती पुढील पिढीला मार्गदर्शक ठरण्यासाठी त्यांच्या नावाने मांजरा कारखान्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यांच्या नावाने ट्रेनिंग सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. मांजरा परिवारातील सर्व कारखाने यशस्वीपणे सुरू असून आ. दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कारखान्यांचे गाळप यशस्वी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.