आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी ३५ फूट फेकली गेली; कार झाडावर आदळून शेतात, मृतांत औरंगाबादचे तिघे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंठा - भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने ती सुमारे ३५ फूट दूर फेकली गेली. कारचालकाचेही नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून कार शेतात गेली. अंगावर शहारे आणणारी ही घटना मंठा शहराजवळ मंगळवारी घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. मृतांत तिघे औरंगाबादचे आहेत.

औरंगाबाद येथून शास्त्री कुटुंब कौटुंबिक कार्यक्रमासाठी आर्टिका कारने (एमएच २०, सीएच ६६८०) नांदेडला जात होते. शास्त्री कुटुंबातील सहा सदस्य व कारचालक असे एकूण सात जण कारमध्ये होते. सकाळी साडेअाठ वाजता खोराडसावंगी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रदीप महादेव दुधमल (२८) पेट्रोल भरण्यासाठी पंपावर जात होते. याच वेळी भरधाव कार येत होती. कारने दुचाकीवरील शिक्षक दुधमल यांना जोरदार धडक दिली. दुधमल दूर फेकले गेले. त्यानंतर लगेच कारही रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीवरील शिक्षक दुधमल यांच्यासह कारमधील चालक गणेश भारत बहुरे (३०), उषा गोपालकृष्ण शास्त्री (७६), शलाका श्रीपाद शास्त्री (४५, सर्व रा. उल्कानगरी, औरंगाबाद) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारमधील धनश्री दीपक शास्त्री (४८), दिशा प्रशांत शास्त्री (४२), ऋचिता श्रीपाद शास्त्री (४१), विनोद संजय शास्त्री (४६) हे चौघे जखमी झाले. सर्व जखमींना जालना येथे हलवण्यात आले आहे.

दुधमल मूळचे उमरीचे
अपघातात ठार झालेले दुचाकीस्वार शिक्षक प्रदीप दुधमल हे मूळ नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील आहेत. सध्या ते नोकरीसाठी मंठा येथे राहत होते. मंठा तालुक्यातील खोराडसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेत ते कार्यरत होते. त्यांच्या पत्नी वैजापूर तालुक्यात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन वर्षांची लहान मुलगी आहे.

वेगमर्यादेचे पालनच नाही
शहर व लोकवस्तीजवळून जाणाऱ्या राज्य मार्गावर वाहन चालवताना वेगांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने याची काळजी घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने वेगमर्यादेचे बंधन असावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कारचा चेंदामेंदा
अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. मोटारसायकल जवळपास ३० ते ३५ फूट अंतरावर जाऊन पडली. शहरापासून जवळ हा अपघात झाल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांच्यासह कार्यकर्ते तत्काळ घटनास्थळी धावून गेले. उपविभागीय पोलिस अधिकारी तेजस्विनी सातपुते, पोलिस निरीक्षक घनश्याम पाळवदे, चंपालाल चरमरे, संदीप वसावे, ए.बी.लोखंडे यांनी जखमींना जालना येथे हलवले.
पुढील स्लाइडमध्ये, पेट्रोल भरून येतो म्हणाले...