आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानूर मठाचा वाद पुन्हा चिघळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरुर कासार - तालुक्यातील मानूर येथील नागनाथ देवस्थानचा वाद पुन्हा चिघळला. गुरुवारी पोलिस संरक्षणात देवस्थानची दानपेटी उघडण्यात येत असताना गावकरी आणि भक्त नागनाथ डोंगरे यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी डोंगरे यास अटक केली आहे.
नागनाथ देवस्थान संस्थानला शेकडो वर्षांची परंपरा असून महाराष्ट्रातील अनेक शहरांशिवाय परराज्यातही या संस्थानची करोडो रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पाच वर्षांपूर्वी विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांचे देहावसान झाल्यानंतर त्यांचे शिष्य गुरुगिरी शिवाचार्य (पूर्वार्शमीचे गुरुलिंगस्वामी) यांना संस्थानच्या गादीवर बसविण्यात आले, परंतु 26 सप्टेंबर 2011 रोजी गुरुगिरी महाराजांचे आजाराने निधन झाले. यानंतर गावकरी आणि भक्तांमध्ये बेबनाव झाला. महाराजांना समाथीही मठाबाहेरच देण्यात आली. याकारणामुळे वाद बराच चिघळला. भक्तांच्या मतानुसार गुरुगिरी महाराजांचा भाचा नागेश पुराणिक हा उत्तराधिकारी नेमण्याचा आग्रह धरला तर गावकर्‍यांचा विरोध आहे.
संस्थानला पोलिस संरक्षण आहे. उत्तराधिकार्‍याचा वाद न्यायालयासह धर्मादाय आयुक्तांसमोर सुरू आहे. त्यामुळे महाराजांची निवासाची, सामानाची खोली, दानपेटी धर्मादाय आयुक्तांमार्फत सील करण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्तांसमोर वादी-प्रतिवादींनी युक्तिवाद केल्यानंतर गुरुवारी दानपेटी उघडण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
निरीक्षकांची भूमिका संशयास्पद - धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत जयसिंग मुसळे, अनंत महाजन या दोन निरीक्षकांना दानपेटी उघडण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यांना पोलिस संरक्षणही होते. परंतु या निरीक्षकांनी मृत गुरुगिरी महाराजांच्या भगिनी ललिता पुराणिक यांना बोलावल्याने गुरुवारी वाद चिघळला, आरेरावी सुरू झाली. अरेरावी करत शिवीगाळ करणार्‍या नागनाथ डोंगरे आणि गावकर्‍यांत चांगलीच जुंपली. हे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर दानपेटी उघडण्यात आली. दानपेटीत सुमारे 68 हजार 247 रुपये निघाले. ही रक्कम शिरूरकासार येथील स्टेट बँकेच्या शाखेत भरणा करण्यात आली. दानपेटी उघडण्यासाठी गरज नसताना निरीक्षकांनी ललिता पुराणिक यांना बोलावल्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली.
नागनाथ डोंगरे कोण ?
नऊ महिन्यांपासून मानूर मठ प्रकरण वादग्रस्त ठरले आहे. मात्र यापूर्वीही मानूर मठात संशयास्पद स्थिती असताना डोंगरे या इसमास पकडण्यात आले होते. या संदर्भातील कागदपत्रांची ने - आणही डोंगरे यांनी केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते धर्मादाय आयुक्त कार्यालयात चाललेल्या प्रकरणात सहा नंबरचे वादी आहेत तर या नागनाथ डोंगरेंमुळे येथील मठाचा वाद उत्तरोत्तर वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थ करू लागले आहेत.
पोलिस निरीक्षकांना धमकी - गुरुवारी दुपारी पोलिसांनी नागनाथ डोंगरेला ताब्यात घेतल्यानंतर वीरशैव संघटनेचे मनोहर धोंडे यांनी भ्रमणध्वनीवरून पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांना धमकी देत डोंगरे यांना सोडण्याची मागणी केली. याबाबत मात्र पोलिसांत नोंद झाली नाही.