आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्ल्स कंपनीत लातूरकरांचे कोट्यवधी रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पर्ल्स (पीएसीएल इंडिया लि.) कंपनीत लातूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असून, गेल्या तीन महिन्यांपासून कंपनीचा व्यवहार बंद झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. दरम्यान, कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे. कंपनीने मात्र सेबी व सीबीआयची चौकशी सुरू असल्याने व्यवहार बंद असल्याचा दावा केला.

या कंपनीकडून १५ वर्षांपासून साखळी पद्धतीने गुंतवणुकीच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत. दरमहा १०० ते १००० रुपयांपर्यंतची ही गुंतवणूक आहे. कमी कालावधीत जास्त मोबदला देण्याचा या कंपनीने फंडा दाखवल्याने जिल्ह्यात सुमारे २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी गुंतवणूक केली आहे. त्यासाठी जवळपास ८०० एजंट नियुक्त करण्यात आले होते. एजंटांना आकर्षक कमिशन व भेटवस्तू, बक्षिसेही दिली जात होती. त्यामुळे गुंतवणुकीची व्याप्ती झपाट्याने वाढली. परंतु २१ ऑगस्ट २०१४ पासून कंपनीने अचानक व्यवहार बंद केल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. रक्कम परत मिळावी म्हणून येथील कार्यालयात ते चकरा मारत आहेत. कंपनीच्या लातूर कार्यालयात आठ कर्मचारी असून ऑगस्टपासून त्यांचे पगारही बंदच आहेत.

रक्कम परत करण्याचे आश्वासन
कंपनीने आपल्या लातूर कार्यालयातील सूचना फलकावर व वर्तमानपत्रात जाहिरात देऊन चौकशी झाल्यानंतर रक्कम परत करण्याचा दावा केला आहे. त्यात म्हटले आहे की, सीबीआयमार्फत कंपनीच्या कामकाजाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे सर्व बँक खात्यांवरील व्यवहार करण्यास मनाई आहे. त्याचबरोबर कंपनीच्या सर्व मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यामुळे सेबीने व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात आम्ही सिक्युरिटीज पुनर्विचार आयोगाकडे (सॅट)अपील केले आहे. चौकशी संपल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यात येतील.

जिल्हाधिका-यांना निवेदन
जिल्ह्यातील अनेकांनी कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. त्यामुळे कंपनीची चौकशी करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मागणी आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडे संतोष बिराजदार, अनिल पवार, रामदास सोनटक्के आदींनी केली आहे.