आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन महिन्यांनंतरही मराठा मोर्चांची धग, बाजारात शुकशुकाट, गावेही पडली ओस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - सिल्लोड, पैठण, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री, खुलताबाद, सोयगावनंतर सोमवारी कन्नडमध्ये विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. यात आयोजकांच्या मते सुमारे अडीच लाख समाजबांधवांची उपस्थिती होती. कोपर्डी हत्याकांड, मराठा आरक्षण तसेच विविध मागण्यांसाठी कन्नडला सोमवारी लाखो मराठा बांधवांच्या ऐतिहासिक उपस्थितीत मराठा क्रांती मूकमोर्चा शांततेत पार पडला.

कोपर्डी येथील अमानुष हत्याकांडातील दोषींना विनाविलंब फाशी व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी व इतर मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास शहरातील गिरणी ग्राउंड येथून मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चात सर्वात पुढे विद्यार्थिनी, नंतर महिला, महिला नेत्या, विद्यार्थी, युवक, पुरुष, राजकीय नेते, स्वच्छता कार्यकर्ते व शेवटी नियोजन कार्यकर्ते सहभागी होते. गिरणी ग्राउंड येथून निघालेला मोर्चा कॉलेज रोड, कॉलेज गेट, हिवरखेडा रोड, कन्या शाळा, बीएसएनएल कार्यालय, शनिमंदिर, सिद्दिकी चौक, शिवाजी महाराज पुतळा येथे वळसा घालून पुन्हा परत तहसीलसमोरून अण्णाभाऊ साठे चौक, पुढे महामार्गावरील विश्रामगृहासमोरून उजव्या बाजूने, बाळासाहेब पवार चौक, हिवरखेडा नाका, कॉलेज रोड आणि शेवटी गिरणी ग्राउंड येथे समारोप झाला. गिरणी ग्राउंड येथे पाच शिवकन्यांनी मराठा मोर्चासंबंधी आपली भूमिका मांडली. बालवाडीत शिक्षण घेणाऱ्या ५ वर्षीय बालिकेने आपल्या कणखर आवाजात आरक्षणाची मागणी करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकर व तहसीलदार विनोद गुंडमवार यांना शिवकन्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन दिले.

विविध समाजांचा पाठिंबा : विविध समाजांनी मोर्चास जाहीर पाठिंबा दर्शवला होता. या वेळी मुस्लिम आरक्षण समितीने मोर्चास पाठिंबा देत केळीवाटप केले. मारवाडी समाजाच्या वतीने मोर्चात पाणी तसेच उत्स्फूर्तपणे इतर समाजांच्या व्यावसायिकांनीही तसेच विश्वास ट्रेडर्स यांनी बिस्किटे, केळी व इतर साहित्य वाटप करण्यासाठी स्टॉल लावले होते. सोशल ग्रुप, केवट समाज मित्रमंडळ, सहकारमहर्षी नारायण पवार प्रतिष्ठान, राजस्थानी समाज सिद्दिकी शाह बाबा समिती, कन्नड तालुका व्यापारी सेना, उदयनराजे मित्रमंडळ, आदींनी पाण्याची व्यवस्था केलेली होती.

पाच वाहनतळ
ग्रामीण भागातून व इतर ठिकाणांहून मोर्चासाठी वाहनांनी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी शहराशेजारी पाच वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती. ब्राह्मणी गराडा रोडवर गॅस गोडाऊनजवळ, उरूस मैदान, राष्ट्रीय महामार्गावर नगर परिषद पाणी फिल्टर येथे, म्हाडा कॉलनी मागे, सरस्वती कॉलनीशेजारी शिवना नदीकिनाऱ्यावरील परिसर येथे वाहनतळ उभारण्यात आले होते. कन्नड तालुक्यातून दुचाकी, चारचाकीसह ट्रॅक्टरने समाजबांधव मोर्चाला आले होते. स्वयंसेवक व पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. शहरातून राष्ट्रीय महामार्गावरून एका बाजूने वाहतूक सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...