आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासाठी दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - मराठा आरक्षणाची मागणी करीत दोन युवकांनी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न रविवारी केला. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्या दोघांना अटकाव करीत ताब्यात घेतले. भागवत नागोराव बरवे (रा. गंगाखेड) व सदाशिव आत्माराम भोसले (खंडाळी, ता. गंगाखेड) अशी त्यांची नावे आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सुरेश धस यांच्या उपस्थितीत स्टेडियम मैदानावर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणास जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर दोघे युवक तेथे आले. त्यांच्याजवळ रॉकेलची बाटली होती. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा घोषणा देत अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले. स्टेडियम मैदानावरील कार्यक्रमात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी एस. पी.सिंह व पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोठा बंदोबस्त तैनात करीत मुख्य प्रवेशद्वारातून केवळ लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, पत्रकार व प्रमुख पदाधिकार्‍यांनाच प्रवेश दिला गेला. दरम्यान, त्या दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.