आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याने अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली, जूनची कसर जुलैत भरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहस्रकुंड | यंदा कोरडा पडलेला नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर असलेला प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा २००६ नंतर प्रथमच खळाळून वाहत आहे. छाया : अनिल मादसवार, हिमायतनगर  - Divya Marathi
सहस्रकुंड | यंदा कोरडा पडलेला नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर असलेला प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा २००६ नंतर प्रथमच खळाळून वाहत आहे. छाया : अनिल मादसवार, हिमायतनगर 
औरंगाबाद - जूनमध्ये रुसलेला पाऊस जुलेमध्ये भरभरून बरसला. अवघ्या आठवडाभरातच त्याने जूनचा बॅकलॉग तर भरून काढलाच शिवाय अपेक्षित पावसाची सरासरीही ओलांडली. नांदेडमध्ये मुसळधार वृष्टी झाल्याने विष्णूपुरी धरण ९० टक्के भरल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले. परभणीत चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली.
१३ तालुक्यांत अतिवृष्टी
नांदेड - तीन दिवस मुक्तपणे बरसणाऱ्या वरुणराजाने गेल्या २४ तासांत विक्रमी हजेरी लावून मंगळवारी विश्रांती घेतली. सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील मुखेड, धर्माबाद व देगलूरचा अपवाद वगळता उर्वरित सर्व १३ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. माहूर तालुक्यात सर्वाधिक १२१ मि.मी. नोंद झाली. लोहा- १०३.६७, किनवट-१०९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. २४ तासांत संपूर्ण जिल्ह्यात एकूण १२३२.७९ (७७.०५) मि.मी. पावसाची नोंद झाली.
गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसाने विष्णुपुरीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. रात्री प्रकल्प तुडुंब भरल्याने सकाळी साडेदहाच्या सुमाराला गेट क्र. १० उघडण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या दरम्यान गेट क्र. १६ उघडण्यात आले. दोन गेट उघडल्याने गोदावरीच्या पात्रात ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
पाण्याचा निचरा सुरू
शहरात झालेल्या पावसाने हमालपुरा, महेबूबनगर, श्रावस्तीनगर, खडकपुरा, बाबानगर, देगलूर नाका आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. रात्रीपासून ते पाणी नाल्यांद्वारे काढण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी पावसाने उघडीप दिल्याने या कामाला वेग आला. हिंगोली गेट, लालवाडी व माळटेकडी या भागातील रेल्वे भुयारी मार्गात पाणी तुंबल्याने हा मार्ग
वाहतुकीसाठी बंद आहे.

हिमायतनगर तालुक्यातही पैनगंगा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे हिमायतनगर-ढाणकी हा विदर्भाला जोडणारा मार्ग बंद आहे. दरम्यान, मंगळवारी पावसाने उघडीप घेतली असली तरी ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. शहरात सूर्यकिरणांचा एक कवडसाही पडला नाही.
परभणीत विश्रांती
परभणी | मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या झडीने मंगळवारी थोड्याफार प्रमाणात विश्रांती घेतली. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण व मधूनच थोडा वेळ भुरभुर होती. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत ४२.७१ मिलिमीटरची झालेली नोंद या वर्षीच्या नोंदीतील सर्वाधिक ठरली. आतापर्यंत २३९.३५ मिलिमीटर पाऊस झाल्याने गोदावरी वगळता अन्य पूर्णा, दुधना नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जुलैच्या मध्यापर्यंतचा हा पाऊस समाधानकारक आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मिलिमीटर अाहे. मागील वर्षी मात्र केवळ ४४ टक्केच पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्या तुलनेत या वर्षी चांगल्या पावसाचे वर्तवलेले भाकीत जिल्ह्यामध्ये जूनमध्ये कमी पाऊस झाल्याने खोटे ठरते की काय, असा अंदाज निर्माण झाला होता. जूनमधील पाऊस अपेक्षित पावसापेक्षा जवळपास ५० मिलिमीटरने सातत्याने कमी होता. जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू झालेल्या पावसाने संततधार हलक्या स्वरूपात हजेरी लावली. विशेषत: शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने सलग चार दिवस सूर्यदर्शनदेखील झाले नाही.
मंगळवारीही सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर ढगाळ वातावरण व भुरभुर होती. त्यामुळे आणखी दोन दिवस चांगला पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील पेरण्यांची उगवण चांगली झाली असून सोयाबीन, तूर, कापसासाठी ही झड चांगली ठरली. मूग व उडदासाठी जमिनीतील पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी पाणी काढून देणे गरजेचे आहे, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाने उघडीप दिल्यास ही स्थिती पिकांसाठी अत्यंत चांगली राहील, असेही म्हटले आहे. मागील २४ तासांत पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ८४ िममी पाऊस झाला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, हिंगोली, बीड जिल्‍ह्यातील स्‍थिती..
बातम्या आणखी आहेत...