आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलावंत जाणार बांधावर, शेतकऱ्यांत जनजागृतीसाठी अरविंद जगताप यांचा पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - आतापर्यंत आपण विविध चित्रपटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. यापुढे प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. शिवाय त्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सिनेदिग्दर्शक अरविंद जगताप यांनी दिली. या कामात अापल्यासोबत मकरंद अनासपुरे यांच्यासह अन्य १० ते १२ कलाकारांचा समावेश असणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.

जगताप यांनी गुरुवारी शहरातील आर्किटेक्ट जगदीश नागरे यांच्या फर्मला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी "दिव्य मराठी'शी संवाद साधला. मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे यांसारख्या कलाकारांना सोबत घेऊन चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या माध्यमातून शेतकरी तसेच गावाकडील समस्या काय आहेत, त्या कशा सोडवल्या जाव्यात ते कथानकातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठल्याही समस्येवरील पर्याय नाही. हे थांबण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रथम सन्मान वाढला पाहिजे. त्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, ही त्यांची असलेली माफक अपेक्षा अगदी योग्य आहे.

गावागावांत मोबाइलचे जाळे पसरले आहे. व्हॉट्सअॅपचाही वापर होत आहे, परंतु आता शेतकऱ्यांनी स्वतंत्र ग्रुप तयार करून शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेे. आपल्या ग्रुपमधील कलाकारांना सोबत घेऊन शेतकऱ्यांत जनजागृतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

जनजागृतीसाठी पुस्तिका
शासन शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना राबवत आहे, शेतकरी व ग्रामस्थांचे काय अधिकार आहेत, याबाबत जागरूक झाली पाहिजे. यासाठी पुस्तिका प्रकाशित करत असून ती प्रत्येक गावात वाटप करण्याबरोबरच व्हॉट्सअॅप, मेलवरही टाकण्यात येणार आहे, असेही जगताप यांनी सांगितले.

चित्रपटांचा दर्जा सुधारतोय
आतापर्यंत वीसहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यातील १० चित्रपट सामाजिक विषयावरील आहेत. प्रेक्षंकाच्या मागणीमुळे "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' चित्रपटाचा दुसरा भाग तयार झाला. मराठी चित्रपटांना मागणी वाढत असून दर्जा सुधारतोय, असे जगताप यांनी सांगितले.

आगामी चित्रपट
संजय जाधव यांचा "तूही रे' हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत असून ही एक लव्ह स्टोरी आहे. यात स्वप्निल जोशी, तेजस्विनी, सई ताम्हणकर यांनी भूमिका केल्या आहेत. तसेच "पन्हाळा' हा चित्रपट याच महिन्यात रिलीज होत आहे.