आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Agriculture University Name Extension Order Passed

मराठवाडा कृषी विद्यापीठ नामविस्तार अध्यादेश जारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - हरितक्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांचे नाव मराठवाडा कृषी विद्यापीठास देण्याचा अध्यादेश सोमवारी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी जारी केला. वसंतराव नाईकांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या जयंतीदिनी कृषी विद्यापीठाच्या नामविस्तारात त्यांचे नाव दिले गेल्याने त्यांच्या कृषी कार्याचा गौरव झाला आहे.

परभणीचे मराठवाडा कृषी विद्यापीठ आता ‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ’ या नावाने ओळखले जाईल.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील महिन्यात कॅबिनेटच्या बैठकीत नामविस्ताराचा ठराव पारित केला होता. त्यानुसार वसंतराव नाईकांच्या जयंतीदिनीच सोमवारी हा अध्यादेश जारी झाला आहे. महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10 नुसार राज्यपालांनी हा नामविस्तार केल्याचे म्हटले आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना 18 मे 1972 रोजी झाली.
स्थापनेपासून कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण कार्यात विद्यापीठाने भरीव कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रात कृषी पदविका, पदवी, पदव्युत्तर व आचार्य हे अभ्यासक्रम राबवले जातात. 1956 ला एकमेव महाविद्यालय असलेल्या विद्यापीठाचा एकूण 44 घटक व संलग्न महाविद्यालयांनी आता कृषी व संलग्न विषयात शिक्षणाचा मोठा वटवृक्ष झाला आहे. संशोधनामध्ये 34 राज्य शासन अनुदानित व 24 भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या अनुदानित योजनेमार्फत शेतक-यांच्या गरजेनुसार संशोधनकार्य केले जाते.


आजपर्यंत विद्यापीठाने शेतक-यांसाठी विविध पिकांचे 128 वाण, 740 संशोधन शिफारशी व 25 विविध प्रकारची कृषी अवजारे विकसित केली आहेत. विस्तार क्षेत्रात 11 कृषी विज्ञान केंद्रे, एक विस्तार शिक्षण गट, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, चार विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रे यांच्यामार्फत विद्यापीठाचे केलेले संशोधन शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचवले जाते.


नाईकांच्या दिशेप्रमाणे मार्गक्रमण
हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासास दिलेल्या दिशेप्रमाणे मार्गक्रमण करीत आहे. त्यात कृषी विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. यापुढेही विद्यापीठ शेतक-यांच्या सेवेत अशाच प्रकारे गतिमानपणे कार्यरत राहील.
डॉ.के.पी.गोरे, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी