आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या विकासासाठी लातूरच्या चर्चासत्रात आवळली वज्रमूठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- राज्यकर्ते नुसतीच आश्वासने देत असल्याने मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी एकत्र आली असून त्यांनी या प्रश्नांवर एल्गार पुकारण्याचा निर्धार केला आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेते अ‍ॅड. मनोहरराव गोमारे अमृतमहोत्सवी समितीच्या वतीने हा पुढाकार घेण्यात आला असून त्याला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे पाठबळ मिळाले आहे. त्यानुसार रविवारी येथे ‘मराठवाड्याचा विकास’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे यांच्या हस्ते झाले, तर चर्चासत्रात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रताप बांगर, जलतज्ज्ञ या. रा. जाधव, के. ई. हरिदास, रेल्वे संघर्ष समितीचे मराठवाड्याचे सरचिटणीस सुधाकर डोईफोडे, जयंत वैद्य, कॉ. डॉ. विठ्ठल मोरे, शेकाप नेते अ‍ॅड. भाई उदय गवारे, सूर्यप्रकाश धूत आदींनी सहभाग घेतला.
चर्चासत्रात मराठवाड्यातील सिंचन, सहकार, शिक्षण, रस्ते आणि रेल्वे आदी रखडलेल्या समस्यांवर विविध अंगाने मंथन झाले. त्यांनतर ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. विकासाचा हा आराखडा तज्ज्ञ मंडळी एकत्र बसून लवकरात लवकर तयार करतील आणि तो राज्यपालांना सादर करण्यात येईल. हे करीत असताना सर्वच राजकीय पक्षांनी आपली बिरुदावली बाजूला ठेवून अन्याय दूर करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून त्याला जनतेनेही पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा विचारपीठावरून व्यक्त करण्यात आली.
संयुक्त महाराष्‍ट्रात मराठवाडा सामील झाला त्या वेळी नागपूर कराराच्या अटी मान्य करण्यात आल्या; परंतु दांडेकर समिती नेमूनही त्यांच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी विकासाचा अनुशेष वाढतच गेला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाड्याला विकासाच्या बाबतीत झुकते माप देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांचाच वारसा सांगणारे मराठवाड्यावर अन्याय करीत असल्याचा आरापेही या वेळी करण्यात आला.

मराठवाड्याला हवे नेतृत्व
पश्चिम महाराष्‍ट्रातील नेत्यांनी मराठवाड्यावर नेहमीच अन्याय केला आहे. त्यामुळे आपले प्रश्न रखडले आहेत. शंकरराव चव्हाण आणि विलासराव मुख्यमंत्री असताना मराठवाड्याला काही मिळाले असले तरी ते अपुरे आहे. त्यामुळे मराठवाड्यातीलच नेतृत्व असण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.

मराठवाडाभर आंदोलन
"चर्चासत्रात सर्वच विषयांवर सहभागी तज्ज्ञांनी आपली मते मांडली. निवेदन दिल्यानंतर राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात येईल. त्यांनतरही काहीच न झाले तर संपूर्ण मराठवाडाभर आंदोलन छेडण्यात येईल. त्यासाठी जनतेने पक्षभेद बाजूला ठेवून सर्व नेते- कार्यकर्त्यांनी साथ द्यावी.''
-अ‍ॅड. उदय गवारे, शेकाप नेते, लातूर

राज्यपालांना घालणार साकडे
विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ या विषयांवर एकत्र येऊन तपशिलात जात मराठावाड्याच्या विकासासाठी किती निधी लागणार आहे, याचा आराखडा तयार करतील. त्यानंतर एका शिष्टमंडळाद्वारे मुंबईत राज्यपालांना एक महिन्याच्या आत निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडणार आहेत.