आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगाची काहिली : दुष्काळी वणव्यात उन्हाची भर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - गेल्या काही दिवसांपासून तापमानाच्या पार्‍यात लक्षणीय वाढ होत असून 40 अंशांवर स्थिरावत आहे. सोमवारी (दि.एक ) नांदेडला 40.8, तर परभणीत 40. 5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दुष्काळाच्या वणव्यात उन्हाची भर पडली असून सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होते. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी अनेकांनी शीतपेयाचा आधार घेतला.
यावर्षी परभणी जिल्ह्यात पाऊस अल्प प्रमाणात झाल्यामुळे फेब्रुवारीतच पाणीपातळी खालावण्यास सुरुवात झाली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाणीपातळी पूर्णपणे खालावल्याने उष्णता अधिक जाणवण्यास सुरुवात झाली. त्यात मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात झालेल्या अवकाळी वारे व पावसामुळे उष्णतेच्या प्रमाणात काही उतार जाणवला; परंतु लगेचच तापमानातील वाढ होण्यास सुरुवात झाली. मार्चअखेर हे तापमान अधिकच वाढत गेले. जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने 27 मार्च रोजी 40.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. हे तापमान सातत्याने कायम राहू लागल्याने उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. शनिवारी 39.5 अंश सेल्सियस, तर रविवारी 39 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याने पार्‍याचा हा आकडा सातत्य राखू लागल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.एक) यात वाढ होवून 40.5 अंश सेल्सियसची नोंद झाली.

नांदेड शहरामध्ये वर्षातील उच्चांक
नांदेडमध्ये सोमवारी तापमान 40.8 से. पर्यत नोंदले गेले. या वर्षातील हे सर्वाधिक तापमान आहे. गेल्या वर्षी 3 एप्रिल रोजी जिल्ह्यात 40 से. तापमानाची नोंद करण्यात आली. यावर्षी 1 एप्रिललाच तापमानाने 40 अंशाचा पारा पार केला. किमान तापमान 24 से. नोंदवण्यात आले. एमजीएम अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक प्रा. श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील आर्द्रता कमी झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने येत्या 48 तासांत मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

लातुरात दररोज 32 हजार शीतपेयांच्या बाटल्यांची विक्री

लातूर जिल्ह्यात सोमवारी तापमान 38.5 अंशांवर गेल्याने उष्म्यामुळे नागरिक त्रस्त झाले. या पार्श्वभूमीवर शीतपेयांना मागणी वाढली आहे. लातूर शहरात
दिवसाकाठी 30 ते 32 हजार शीतपेय बाटल्यांची विक्री होत आहे.
या आठवड्यात उन्हाने आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. सकाळी आठ वाजेपासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. दुपारी तापमान 37 ते 38 अंशांवर जात असल्याने प्रखर उष्म्याचा अनुभव येत आहे. कलिंगड, चिकू व खरबुजांना मागणी वाढली आहे. गुरांना तापाची लागण व न्यूमोनिया होत आहे. उन्हामुळे बाष्पीभवनचा वेग वाढला असून पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. 127 पैकी 58 लघु तलाव कोरडे पडले आहेत. मांजरा व तेरणा प्रकल्पात मृतसाठा राहिला आहे. तावरजा कोरडे पडले असून देवर्जन प्रकल्पात 13, साकोळ 15, घरणी 16, व्हटी 32, रेणापूर 36 व तिरू प्रकल्पात 52 टक्के पाणीसाठा राहिला आहे.

येत्या काही दिवसांत पारा आणखी वाढणार
तापमानाचा पारा 40 अंशांवर स्थिरावला असला तरी येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या मध्यात तापमान 45 अंशापर्यंत पोहोचेल. यापूर्वी 19 व 25 मे 2010 रोजी कृषी हवामान केंद्रात सर्वाधिक 46 अंश सेल्सियस अशा विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. हे तापमान 1984 नंतर प्रथमच 46 अंशांवर गेल्याने त्याची विक्रमी नोंद झाली. गतवर्षी तापमान 44 अंशापर्यंत पोहोचले होते. सध्या जमिनीतील पाणीपातळी खालावल्याने तापमानात आठ दिवसांत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.’’
ए.आर.शेख, वेधशाळा निरीक्षक, कृषी हवामान केंद्र