आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा चढला, अवकाळी बरसला, मतांचा टक्काही वाढला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड/उस्मानाबाद/लातूर/हिंगोली/परभणी/नांदेड - काही अपवाद वगळता मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले. विदर्भात झालेल्या 10 टक्के वाढीच्या आसपास मराठवाडाही पोहोचला. सरासरी 7 टक्के वाढ झाली. पारा 40च्या घरात असतानाच अवकाळी पावसानेही हजेरी लावली. लातूर आणि उस्मानाबादच्या काही भागांत पाऊस कोसळला. यामुळे मतदारांची त्रेधातिरपीट उडाली.

दरम्यान, राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बीड मतदारसंघातील भाजपचे दिग्गज उमेदवार गोपीनाथ मुंडेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री सुरेश धस यांचे भवितव्य यंत्रात बंद झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव, डॉ. पद्मसिंह पाटील यांनी अतिशय प्रतिष्ठेची केलेली निवडणूक महायुतीच्या उमेदवारांनीही तितक्याच ताकदीने लढवली. 16 मे रोजी जाहीर होणार्‍या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लातुरात पाऊस
लातूर शहरात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे मतदारांची तारांबळ उडाली. दुपारी बारा वाजेपर्यंत कडक ऊन होते. तथापि, दोन वाजेपासून आकाश ढगाळ झाले. पावणेतीनच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. तो पावणेतीन तास बरसला. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. औसा व रेणापूर तालुक्यांतही हलका पाऊस झाला. उस्मानाबाद शहरासह तालुक्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला.

हिंगोलीत 4 ठिकाणी यंत्रात बिघाड
हिंगोली, जवळा बाजार आणि अन्य दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडले. काही वेळाने पर्यायी व्यवस्था करण्यात आली. क्षुल्लक वादाचे प्रकार गवळता हिंगोली मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले.

टाकळगावचा बहिष्कार
लातूर मतदारसंघातील टाकळगाव (ता. लोहा, जि. नांदेड) येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्यामुळे तेथील 1500 जणांचे मतदान झाले नाही. तीन-चार ठिकाणी मतदान यंत्रे खराब झाल्याने ती तत्काळ बदलण्यात आली.

मतदानाला विलंब
उमरी तालुक्यातील मंडाळा येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने एक तास विलंबाने मतदानाला प्रारंभ झाला. त्यामुळे केंद्रावर सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते, अशी माहिती तहसीलदार उदय शहाणे यांनी दिली.

नवरदेवाचे मतदान
नांदेड शहरातील दिनेश दाड या चार्टर्ड अकाउंटंटचे गुरुवारी माहेश्वरी भवनात लग्न होते. लग्न लागल्यानंतर दुपारी 3 वाजता लेबर कॉलनी भागातील मतदान केंद्रात जाऊन दाड यांनी नवरदेवाच्या वेशातच मतदानाचा हक्क बजावला.