आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याची खादी दिल्लीत कडक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - खादी उद्योगात आपली स्वतंत्र ओळख देणार्‍या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीस राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून खादी उत्पादन व विक्रीत त्यांनी दिलेले योगदान या पुरस्कारामुळे देशपातळीवर अधोरेखित झाले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात या पुरस्काराचे 3 एप्रिलला वितरण झाले. समितीचे सचिव माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
5 वर्षांपूर्वी स्फूर्ती नावाच्या योजनेअंतर्गत खादी ग्रामोद्योग आयोग मुंबईने मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला 95 लाखांचा निधी दिला होता. त्यात समितीने 15 लाखांची भर टाकून तिचा विनियोग अद्ययावत यंत्रसामग्री व पायाभूत सुविधा उभारण्यावर केला. परिणामी उत्पादनाला वेग आला. विक्री वाढली व नफा मिळाला. आयएसओ मानांकनही मिळाले. या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली व समिती पुरस्काराची मानकरी ठरली. समिती स्थापनेनंतर प्रथमच असा पुरस्कार समितीला मिळाला आहे.
जाज्वल्य इतिहास
देशाच्या स्वातंत्र्यासाठीची प्रेरणा ठरलेल्या खादीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांनी लक्ष पुरवले होते. यातूनच सन 1955 मध्ये हैदराबाद खादी समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या वेळी मराठवाड्याचा काही भाग, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांत या समितीचे काम चालत होते. सन 1967 मध्ये स्वामीजी व गोविंदभार्इंनी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. पहिले अध्यक्ष म्हणून अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांची, तर सचिव म्हणून डी. जी. बिंदू यांची निवड करण्यात आली. त्या वेळी उदगीर, बीड व कंधार येथे खादी उत्पादन केंदे्र सुरू केली. सध्या समितीचे अध्यक्ष म्हणून ना. वि. देशपांडे, तर सचिव म्हणून भोसीकर काम पाहत आहेत.

मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे काम
आजघडीस मंडळाची कंधार, औसा, उदगीर व अक्कलकोट येथे उत्पादन केंद्रे आहेत. औसा केंद्रात खादी कपडा तयार होतो. उदगीरचे केंद्र राष्ट्रध्वजासाठीच्या कापडाची निर्मिती करते, कंधारच्या केंद्रात सतरंजी व आसनपट्ट्या तयार होतात, तर अक्कलकोट केंद्रात पॉलीवस्त्र व मिक्स खादी तयार होते. 85 कर्मचारी असून 650 कारागिरांना रोजगार मिळतो. विशेष म्हणजे कारागिरांमद्ये 85 टक्के महिला आहेत. 18 विक्री केंदे्र आहेत. दरवर्षी 2 कोटी 45 लाखांचे खादी उत्पादन होते. भारतातील 200 संस्थांचा या समितीशी संबंध असून त्यांच्या उत्पादनाचीही ही समिती विक्री करते. दरवर्षी जवळपास 4 कोटी रुपयांचा माल विकला जातो. आता सर्वच सुविधा असल्याने व काळाच्या कसोटीवर खादीला नवे रूप दिल्याने उत्पादन वाढ होऊन समिती नफ्यात चालत आहे.