आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या पावसाचा तेलंगणाला लाभ, पोचमपाड प्रकल्प निम्मा भरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांतच वार्षिक सरासरीच्या ६१.६४ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील प्रकल्पांना मात्र पावसाचा फार लाभ झाला नाही. गेल्या वर्षी कोरडाठाक पडलेल्या तेलंगणातील पोचमपाड प्रकल्पाचाच पावसाने सर्वाधिक फायदा झाला.
सन २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरीच्या ४५.३५ टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षी ५५ टक्के पाऊस झाला. यंदा पावसाने दगा दिला नाही. जून महिन्यापासून जलधारा बरसत राहिल्या. जून, जुलै या

दोन महिन्यांत जिल्ह्यात एकूण ५८८.२१ मि.मी. पाऊस झाला.
वार्षिक सरासरीच्या हा पाऊस ६१.५६ टक्के आहे. दोन वर्षे दुष्काळाचा जबर फटका बसलेल्या बळीराजाला पावसाने दिलासा दिला.

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात अद्यापही ठणठणाटच
जिल्ह्यात झालेल्या पावसाने विष्णुपुरी बंधारा तुडुंब (८६.५३ टक्के) भरला. त्यामुळे शहराची पाणीटंचाईची समस्या निवारण झाली; पण नांदेड पाटबंधारे विभागात असलेले इतर प्रकल्प अद्यापही रिकामेच आहेत. मंगळवारची प्रकल्पाची स्थिती पाहता अजूनही चांगल्या व सलग पावसाची आवश्यकता असल्याचे चित्र आहे. इसापूर प्रकल्पात २७ टक्के, लोअर मानार- ७, अप्पर मानार- ८, येलदरी- ६.८३ व सिद्धेश्वर- १२ टक्के साठा आहे. नांदेड, हिंगोली
जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने गोदावरी, कयाधू, आसना या नद्यांना चांगले पूर आले. विष्णुपुरी बंधाऱ्याचे दरवाजे दोन-तीन वेळा उघडावे लागले. या तिन्ही नद्यांचे पाणी तेलंगणातील पोचमपाड प्रकल्पात गेले.

ऑक्टोबरमध्ये न्यायालयात जाणार
बाभळी बंधाऱ्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश मराठवाड्याच्या हिताचे नाहीत. पावसाळ्यात दरवाजे उघडावे लागतात. आजकाल पावसाळाच कमी झाल्याने नंतर पाणी राहत नाही. याशिवाय मार्च महिन्यातही ०.६ टीएमसी पाणी तेलंगणाला सोडावे लागते. या अटीमुळे बंधारा काहीही उपयोगाचा नाही. त्यामुळे येत्या ऑक्टोबरमध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती कृती समितीचे सचिव प्रा. डॉ. बालाजी कोंपलवार यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...