आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathwada Region Infest The Soil Texture, Chemical Fertilizers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रासायनिक खतांच्या वापराचा फटका, मराठवाड्यातील जमिनीचा पोत खालावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आधुनिक शेतीच्या नावाखाली व अधिक उत्पादन घेण्याच्या चढाओढीत शेतकरी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करत आहेत. याचबरोबर एक पीक पद्धतीमुळे शेतीची सुपीकता खालावली आहे. सेंद्रिय कर्ब 0.8 टक्के असायला हवा, तो केवळ 0.2 व 0.4 टक्केच आहे. नत्राचे प्रमाण 90 ते 100 टक्के, स्फुरद 60, जस्त व गंधक 30 ते 40 टक्क्यांनी कमी आहे. या अन्नघटकांच्या कमतरतेमुळे शेतीला नापिकीचा धोका वाढल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व कृषी विभाग औरंगाबाद यांनी केलेल्या माती परीक्षण अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या कारणामुळेच मराठवाड्याची शेती तोट्यात आहे. खर्च अधिक व उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाली आहे.
पिकांसाठी समाधानकारक पावसाप्रमाणेच जमिनीची सुपीकताही महत्त्वाची आहे. ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी शेतकरी व कृषी विभागाची आहे. त्यासाठी दरवर्षी माती परीक्षण करून शेतकर्‍यांना सुपीकतेविषयी माहिती दिली जाते. पण त्याचा काहीच उपयोग झालेला दिसत नसल्याचे कृषी विभाग व विद्यापीठाच्या अहवालातून स्पष्ट होते. त्यामुळे रासायनिक खतांचा असंतुलित वापर, एक पीक पद्धत, सेंद्रिय खताचा अत्यल्प वापर आदी कारणांमुळे मराठवाड्यातील शेतीचा सेंद्रिय कर्ब 0.3 ते 0.4 टक्क्यांनी पुन्हा खालावला आहे. नत्राचे प्रमाण शंभर टक्के कमी आहे. इतर अन्नघटकांचीही कमतरता आहे. त्यामुळे शेतीच्या पृष्ठभागातील गांडूळसारखे शेतीमित्र जिवाणू नष्ट झाले आहेत. जमीन चोपण व क्षारयुक्त झाली आहे. आम्लतेचे प्रमाण वाढले आहे. जमिनीत हवा खेळून राहत नाही. जलपुनर्भरण होत नाही. पाण्याबरोबर माती वाहून जाते. कपाशी किंवा मका हे एकच पीक शेतकरी घेत असल्याने खर्च अधिक व उत्पादन कमी होत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही पोत आणखी घसरू शकतो.
16 अन्नघटक असे
हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मंगल, तांबे, जस्त, मॅलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन या सोळा अन्नघटकांच्या उपलब्धतेवर सुपीकता अवलंबून आहे. हे अन्नघटक टिकवून शेतीचे आरोग्याचे संवर्धन व संरक्षण करणे शेतकर्‍यांच्याच हातात आहे.

मातीचे कण 45 टक्के, हवा आणि ओलावा 20 टक्के, सेंद्रिय कर्ब 5 टक्के शेतजमिनीत असायला हवा. पण सेंद्रिय कर्ब केवळ 0.2 टक्के आहे. पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जात आहे. जलपुनर्भरणाची व्यवस्था नसल्याने ओलावा शिल्लक राहिला नाही. तो खालावला आहे. त्यामुळे शेताच्या पृष्ठभागातील आवश्यक जिवाणू कमी झाले आहेत, असे कृषी सहसंचालक जनार्दन जाधव म्हणाले.

4अन्नघटक व सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या मदतीने कपाशीसाठी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व पालाश, 20 किलो गंधक व जस्त, सोयाबीनसाठी 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 30 किलो पालाश व 20 किलो गंधकाचा वापर करावा. कृषी विभागाने शिफारस केलेल्या खतांचा वापर करून सुपीकता वाढवावी, अशी माहिती डॉ. डी. व्ही. पाटील यांनी दिली.
असे केले माती परीक्षण
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच ते सात हजार मातीचे नमुने कृषी विद्यापीठाच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. जेथे हलकी जमीन आहे तेथील सेंद्रिय कर्ब 0.1 टक्काच आहे. मध्यम ते भारी जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.2 ते 0.4 टक्के आहे. ही गंभीर बाब आहे.
निरीक्षण
- सेंद्रिय कर्ब केवळ 0.2, 0.4, नत्र 90 ते 100 टक्के
- स्फुरद 60, जस्त व गंधक 30 टक्के कमी
- दहा वर्षांत 0.2 टक्क्यांनी शेतीचा सेंद्रिय कर्ब घसरला