आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ स्वत:च्या कुटुंबाच्या घशात !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - धूर्त राजकारणी असलेल्या मधुकरराव मुळे यांनी राजकीय दुहीचा फायदा घेत एकमेकांना झुंजवत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्वत:च्या कुटुंबाच्या घशात घातली. संस्थेत लाखो रुपये मोजल्याशिवाय नोकरीचं कामच होत नाही! अशी मलिन झालेली संस्थेची प्रतिमा सुधारण्याचं आणि बदनामी थांबवण्याचं आमच्या समोर मोठं आव्हान आहे, असे ‘मशिप्र’ चे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.


आमदार सोळंके यांनी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ‘दिव्य मराठी’च्या बीड कार्यालयास भेट दिली. ते म्हणाले, मंडळात सत्तांतर झाले ते मुख्यत्वे मुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या कारभारामुळे. त्यांच्या काळात भौतिक विकास साधला गेलाही असेल, परंतु ज्या उद्दिष्टांना समोर ठेवून दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची प्रेरणा घेत विनायकराव पाटील यांनी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, तिला तिलांजली देण्याचं काम झालं. शिक्षकी पेशातून राजकारण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, सहकारमंत्री अशी मजल मारणारे विनायकराव पाटील यांनी मराठवाड्यातील गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत, शिकून मोठी झाली पाहिजेत, हा उद्देश समोर ठेवला. त्यांच्या काळात मंडळाचे तत्कालीन सरचिटणीस सुंदरराव सोळंके यांनी 29 वर्षे त्यांना जोमाने साथ दिली. संस्थेचा विस्तार, तालुका तेथे कॉलेज, गाव तेथे शाळा उघडण्याला प्राधान्य दिले. तेव्हाच्या काळात भौतिक साधनं कमी होती, परंतु दर्जेदार शिक्षणाची त्यांनी सोय केली. संस्थेत नोकरी लागण्याला एकही पै मोजावी लागणार नाही, असा लौकिक तयार केला. बारा- तेरा वर्षांच्या काळात मुळे यांनी संस्थेला या तत्त्वापासून कोसो दूर नेले. नोकरी लागण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत, असा आरोपही त्यांनी केला.


व्यावसायिक शिक्षण
बाजारीकरणाचा कलंक पुसून टाकण्याचे आमच्यासमोर आव्हान आहे. यासोबतच व्यावसायिक शिक्षण, आयआयटी, पॉलिटेक्निक, मॅनेजमेंट, पॅरामेडिकल यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही सोळंके या वेळी म्हणाले.