आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada's Eminant Journalist Sudhakar Doiphode

मराठवाड्याचा लढवय्या पत्रकार सुधाकर डोईफोडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - सुधाकरराव डोईफोडे हे नाव मराठवाड्यासाठी अपरिचित नाही. हैदराबाद मुक्तिसंग्राम असो, रेल्वे संघर्ष समिती असो अथवा पत्रकारिता असो, या नावाचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. नांदेडचे सुपुत्र असलेल्या सुधाकररावांनी ही कीर्ती प्रयत्नपूर्वक मिळवली.
सुधाकररावांचा जन्म नांदेड येथे 1937 मध्ये महालक्ष्मी सणाच्या दिवशी झाला. तो काळ निझाम राजवटीचा होता. सर्वत्र अराजकाची स्थिती होती. निझामाचे सैनिक लोकांवर हल्ले करीत. त्यामुळे लोकांना स्वसंरक्षणासाठी प्रतिकार, प्रतिहल्ले करावे लागत. अशा वातावरणात ते बालवयातच हैदराबाद मुक्तिसंग्रामाकडे ओढले गेले. देशात नक्की क्रांती होणार अशी त्यांची समजूत होती. त्यासाठी त्यांनी रायफल, पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षणही घेतले. वृत्ती लढवय्यी असल्याने त्यांना सैन्यात जायचे होते, परंतु त्या काळात त्यांना बंदूक हाती घ्यावी लागली नाही. मुक्तिसंग्रामात त्यांच्याकडे पत्रके वाटणे, दारूगोळा, शस्त्रास्त्र, गोपनीय कागदपत्रांची ने-आण करणे हीच कामे आली. वयाच्या 11 व्या वर्षी मनाई आदेश मोडून त्यांनी निझामविरोधी मोर्चात सहभाग घेतला. पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. पोलिसांनी त्यांना अटक केली, परंतु वकिलांच्या मध्यस्थीने अल्पवयीन म्हणून त्यांची सुटका झाली. शहरातील होळी भागात झालेल्या झेंडा आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
रेल्वे आंदोलनात सहभाग
सुधाकररावांना दुसरे आकर्षण पत्रकारितेचे होते. 1945 पासून ते ‘नवा काळ’चे नियमित वाचक होते. 1950 पासून त्यांनी वृत्तपत्रात लिहिण्यास प्रारंभ केला. नाशिकचा गावकरी आणि हैदराबादहून प्रसिद्ध होणारा ‘मराठवाडा’ या दैनिकात त्यांचे लिखाण सुरू झाले. ते मुळात समाजवादी विचारसरणीचे असल्याने अनंतराव भालेरावांचा ‘मराठवाडा’ त्यांना जवळचा वाटे. त्यांचे आजोळ नाशिकचे. दर उन्हाळ्यात नाशिकला जाताना मनमाडला मीटर गेज रेल्वेतून उतरून ब्रॉडगेज रेल्वेत बसताना त्यांना आपल्याकडील रेल्वे लहान का, हा प्रश्न पडायचा. त्या वेळी त्यांना मोगलाइतल्या रेल्वे लहानच असतात, असे आजोळी चिडवले जायचे. यातून रेल्वेच्या प्रश्नांनी त्यांच्या मनात घर केले. 1951-52 च्या सुमाराला मराठवाड्यात ब्रॉडगेज रेल्वे सुरू झाली पाहिजे यावर त्यांनी लेख लिहिला. लेख घेऊन ते स्वत: हैदराबादला अनंतराव भालेरावांना भेटायला गेले. तेव्हा तो लेख पाहून अनंतरावांनी त्यांची खरडपट्टी काढली. आहे ती रेल्वे उखडून कोठे नवी लाइन टाकता येते का? हा प्रश्न करून अनंतरावांनी तो लेख छापण्यास नकार दिला. कालांतराने मराठवाड्यात ब्रॉडगेज व्हावे यासाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व अनंतरावांनीच केले. त्यानंतर तो लेख घेऊन सुधाकरराव नाशिकला दादासाहेब पोतनीसांकडे गेले. त्यांनी तो लेख वाचून विषय नवा असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली. लेख ठेवून घेतला. त्यानंतर 15 दिवसांनी तो लेख ‘गावकरी’त प्रसिद्ध झाला. सुधाकररावांच्या आयुष्यातला तो पहिला लेख ठरला. त्यानंतर 1953 मध्ये त्यांनी रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांना मराठवाड्यातील ब्रॉडगेजबाबत पत्र लिहिले. त्याची पोचही मिळाली. तब्बल 50 वर्षे चिवट लढा देऊन त्यांनी ब्रॉडगेजची मागणी पूर्ण केली. आज मराठवाड्यात जे रेल्वेचे जाळे आहे त्याचे श्रेय सुधाकररावांना जाते. तथापि रेल्वेचा नांदेड विभाग दक्षिण मध्य रेल्वेतून काढून मध्य रेल्वेला जोडावा ही त्यांची आग्रही मागणी मात्र अखेरपर्यंत अपूर्णच राहिली. लातूर-मुंबई गाडी नांदेडपर्यंत सोडावी यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. ते अखेरचे ठरले.
पुरस्कार : 1975, 1977 व 1982 उत्कृष्ट अग्रलेखाबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचे डहाणूकर पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा 1995 चा बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार, 1994- अनंतराव भालेराव पुरस्कार, मीनाताई प्रतिष्ठानतर्फे 1998 चा नांदेडभूषण पुरस्कार, 1998 आचार्य अत्रे जन्मशताब्दी समितीचा सर्वश्रेष्ठ पत्रकार पुरस्कार, 1999 चा मराठवाडा मराठवाडा गौरव पुरस्कार, 2000 नरहर कुरुंदकर पुरस्कार, ‘शब्दबाण’ला उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, 2003 स्वामी रामानंद तीर्थ पुरस्कार, विष्णुकवी मठातर्फे संतश्रेष्ठ विष्णुकवी पुरस्कार, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम नवी दिल्ली 2004 चा सेवादल गौरव पुरस्कार, 2004 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार.
अल्पपरिचय
> जन्म- 14 सप्टेंबर 1937
> शिक्षण- एलएलबी (पुणे विद्यापीठ)
> वयाच्या 12 व्या वर्षापासून वृत्तपत्रीय लिखाण
> 15 व्या वर्षापासून वार्ताहर म्हणून नवशक्ती, लोकमित्र, मराठवाडामध्ये कार्यरत
> 1956 पासून दै. लोकसत्ताचे वार्ताहर
> 1952 पासून मनमाड-नांदेड ब्रॉडगेजसाठी रेल्वे आंदोलनात सक्रिय
> 1 जून 1962 रोजी ‘प्रजावाणी’ साप्ताहिक सुरू.
> 1967-74 आणि 1984 ते 1991 या कालावधीत नांदेड नगरपालिकेचे सदस्य
> 1985-86 मध्ये नगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती
> निझाम राजवटीविरुद्ध लढा, रेल्वे भाववाढ विरोधी, संयुक्त महाराष्ट्र, कच्छ बचाव, भूमिमुक्ती, मराठवाडा विकास आदी आंदोलनात सक्रिय सहभाग.
मान्यवरांच्या शोक संवेदना
सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील आधारवड कोसळला
निझामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झालेल्या मराठवाड्याला विकासाचा टप्पा गाठण्यासाठी पत्रकारिता व सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सुधाकरराव डोईफोडे यांनी केलेला संघर्ष सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील आधारवड कोसळला आहे.
अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
विकासाचे प्रश्न लावून धरले
‘प्रजावाणी’चे संपादक, स्वातंत्र्यसैनिक, प्रखर व परखड विचारसरणीचे पत्रकार सुधाकरराव डोईफोेडे यांचे निधन झाले. ‘मराठवाड्यातील पत्रकारितेतील भीष्माचार्य’ असाच त्यांचा गौरव करावा लागेल. मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न त्यांनी सातत्याने लावून धरले. निर्भीड पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या निधनाने एक ललित लेखक, पत्रकार, कार्यकर्ता, विचारवंत असा चतुरस्र प्रज्ञेचा पत्रकार आपण कायमचा गमावला आहे.
प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
झुंजार पत्रकार हरपला
सुधाकर डोईफोडे यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्रसृष्टीतील झुंजार पत्रकार हरपला आहे, डोईफोडे यांचा उत्तम व्यासंग होता. त्यांची लेखनशैली आकर्षक होती. मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी तळमळीने विविध व्यासपीठावर अभ्यासपूर्ण आणि आग्रही भूमिका सातत्याने मांडली. त्यांच्या निधनाने व्यासंगी, बहुश्रुत आणि शैलीदार लेखणी असलेल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत.
पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री