आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्क स्मशानभूमीत पार पडला विवाह सोहळा; हुंडाबी नाय, अन पैशांची उधळपट्टी पण नाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाष गायकवाड तसेच मंजुश्रीचा स्मशामभूमीत विवाह झाला. - Divya Marathi
सुभाष गायकवाड तसेच मंजुश्रीचा स्मशामभूमीत विवाह झाला.
परतूर- दोन जीवांचे, दोन कुटुंबाचे ऋणानुबंध जुळून येणे म्हणजे विवाह. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याचा हा अविस्मरणीय सोहळा सर्वांच्या कायम लक्षात राहावा, यासाठी नानाविध उपाय योजिले जातात. लाखो रुपयांची उधळण केली जाते. मात्र, परतूर शहरात शुक्रवारी चक्क स्मशानभूमीत पार पडलेला मसनजोगी समाजाचा पारंपारिक आदर्श विवाह सोहळा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. 

परतूर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत प्रेत जाळण्याची व्यवस्था पाहणारे मसनजोगी सुभाष गायकवाड यांची मुलगी मंजुश्री हीचा विवाह मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत राहणाऱ्या मसनजोगी साहेबराव पवार यांचा मुलगा आकाश याच्याशी २१ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास प्रेत जाळण्याच्या ओट्यावरच संपन्न झाला. स्मशानभूमी हे नाव जरी उच्चारले किंवा कानी पडले तर क्षणभर मन खिन्न होते. स्मशानाजवळून गेले तर एक अनामिक नकारात्मक भावना मनात निर्माण होते. मात्र, २१ एप्रिल रोजी परतूरच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत मोठा उत्साह पाहायला मिळाला. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला रंगी-बेरंगी कमानीने सजवण्यात आले होते. आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. प्रेत जाळण्याच्या ओट्याजवळच मोठा शामियाना उभारण्यात आला होता. सुमधुर संगीताचे सूर सगळीकडे घुमत होते. सगळा परिसर गर्दीने फुलून गेला होता. येथे येणाऱ्या प्रत्येकाला क्षणभर वाटले, आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही. पण ठिकाण बरोबर होते वैकुंठधाम स्मशानभूमी. या अनोख्या विवाह सोहळ्याला औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, धर्माबाद येथील मसनजोगी समाजाचे वधू- वरांचे नातेवाईक तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, राजकारणी, शिक्षक, डॉक्टर, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्मशानभूमी हीच कर्मभूमी...
स्मशानभूमी हीच आपली कर्मभूमी मानणारा मसनजोगी समाज आजही आपल्या पारंपरिक रूढी-परंपरांशी तेवढाच बांधिल आहे, असे या विवाह सोहळ्यावरून लक्षात येते. एक रुपयाही हुंडा न घेता, पैशाची कुठलीही उधळपट्टी न करता अत्यंत साध्या पद्धतीने तेही आपल्या कर्मभूमीत म्हणजेच स्मशानात लग्न करण्याची या समाजाची परंपरा आजही कायम आहे. 

तरुणांनी हुंडा पद्धती थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा 
दानशूरांनी केलेल्या मदतीवर आम्ही संसार-प्रपंच चालवतो. यातून थोडी बचत करून मुलांचे शिक्षण, विवाह पार पाडावे लागतात. समाजात हुंडा देण्या-घेण्याची प्रथा नाही. मुला-मुलींच्या पसंतीवरच विवाह ठरवले जातात, असे सुभाष गायकवाड म्हणाले. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरणारा हुंडा हा महत्त्वाचा घटक आहे. हुंडा पद्धती असणाऱ्या प्रत्येक समाजातील सुशिक्षित तरुणाने ही पद्धती थांबविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा.पांडुरंग नवल म्हणाले. 

अनिष्ट प्रथेपासून दूर 
या लग्नातील वधू मंजुश्री ही सुशिक्षित असून तिने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केलेले आहे. स्मशानात लग्न लावून देण्याच्या आपल्या वडिलांच्या निर्णयाला तिने विरोध न करता समर्थनच केले. मुलीच्या लग्नात हुंडा देण्यासाठी कर्जबाजारी होणाऱ्या बापाला शेवटी आत्महत्येचा पर्याय स्वीकारावा लागणाऱ्या हुंड्याच्या चिंतेपायी वडिलांची होणारी फरफट सहन झाल्याने आत्महत्या करणाऱ्या शितल वायाळच्या महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतका असणारा मसनजोगी समाज मात्र आजही हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेपासून दूर आहे. ही याठिकाणी वाखणण्याजोगी बाब होती.
बातम्या आणखी आहेत...