आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे नाटक करून लुटणारे रॅकेट असण्याची शक्यता, वधू-वर सूचक केंद्र पोलिसांच्या रडारवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - युवकासोबत लग्नाचे नाटक करून दागिन्यांसह पळ काढणाऱ्या महिलेसह तिचा पती व संबंधित वधू-वर केंद्राच्या चालकाला बदनापूर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुणावली आहे. यात अटक केलेले दांपत्य बुलडाणा जिल्ह्यातील लोणारचे अाहेत, तर अशा प्रकारे बनाव करून लुटणारे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे.  
 
गणेश सदाशिव कुलकर्णी (गारखेडा परिसर, औरंगाबाद) याचे लग्न जमवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान, बदनापूर तालुक्यातील कंडारी येथील संत भगवान बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही सर्वधर्मीयांचे विवाह जुळवत असल्याची माहिती गणेश कुलकर्णी यांना मिळाली. त्यानुसार १५ दिवसांपूर्वी त्यांनी कंडारी येथे संस्थेचे काकाजी खाडे यांची भेट घेतली. त्यानंतर खाडे यांनी दोन दिवसांनंतर मुलगी बघण्यासाठी कुलकर्णी यांना बोलावले व मुलगी दाखवली. सदर मुलगी नाशिक जिल्ह्यातील असून तिचे नाव पूजा चव्हाण आहे व सोबतचा तिचा भाऊ गणेश चव्हाण असल्याचे खाडे यांनी कुलकर्णी कुटुंबीयांना सांगितले.

या वेळी गणेश कुलकर्णी यांना मुलगी पसंत पडल्याने त्यांनी विवाह नोंदणीपोटी खाडे यांना एक लाख साठ हजार रुपये दिले. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी गणेश कुलकर्णी व पूजा यांचे बदनापूर येथे लग्न लावून देण्यात आले.

लग्नानंतर हे दांपत्य औरंगाबाद येथे गेले. मात्र, संबंधित वधूने चार दिवसांतच दागिन्यांसह घरातून पळ काढला. याप्रकरणी गणेश कुलकर्णी यांनी १४ ऑगस्ट रोजी बदनापूर पोलिस ठाण्यात संबंधित महिला व वधू-वर सूचक केंद्रचालकाविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कंडारी येथील संबंधित वधू-वर सूचक केंद्राच्या चालकासह पूजा चव्हाण व गणेश चव्हाण यांना ताब्यात घेतले. पोलिस तपासादरम्यान पूजा व गणेश हे भाऊ- बहीण नसून पती-पत्नी असल्याचे, शिवाय त्यांचे खरे नाव ज्योती बद्री तारे व बद्री लक्ष्मण तारे असल्याचे समारे आले असून हे दांपत्य मांडवा (तालुका लोणार, जि. बुलडाणा) येथील आहे.

वर्षभरापूर्वी लग्नासाठी एका महिलेची विक्री  
बदनापूर तालुक्यातून वर्षभरापूर्वी लग्नासाठी एका महिलेची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तर आता अशा प्रकारे लग्नाचे नाटक करून फसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या रॅकेटची पाळेमुळे इतर जिल्ह्यांतही असू शकतात, असा पोलिसांना संशय आहे.

कंडारी येथून घेतले ताब्यात  
औरंगाबाद येथून हे दांपत्य बदनापूर तालुक्यातील कंडारी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास अधिकारी जॉन कसबे यांनी ज्योती, बद्री तारे या दांपत्यांसह काकाजी खाडे अशा तिघांना बदनापूर येथून ताब्यात घेतले.
 
बातम्या आणखी आहेत...