परंडा - माहेरहून दीड लाख रुपये न आणल्याचा राग मनात धरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला पेटवले. विवाहितेच्या बाजूलाच असणा-या दोन वर्षांच्या मुलालाही काही क्षणांत ज्वाळांनी घेरले. अंगावर शहारे आणणा-या या घटनेत दोघांचाही अंत झाला. ही घटना मंगळवारी (दि. ५) दुपारी १२.३० च्या सुमारास देवंग्रा (ता. भूम) येथे घडली. छकुली ऊर्फ कल्पना लक्ष्मण बरकडे (२७) यांचा सासरच्या मंडळींकडून सतत छळ करण्यात येत होता. घराचे बांधकाम व विहीर खोदण्यासाठी दीड लाख रुपये आणावेत यासाठी छळ सुरू होता. मंगळवारी तर कल्पनाला घराबाहेर हाकलून देण्यात आले, त्यांनी जाण्यास नकार देताच सासरची मंडळी बिथरली. पती लक्ष्मण बिरमल बरकडे, सासरा बिरमल, सासू गंगुबाई, दीर बापूराव, जाऊ स्वाती, नणंद अलका टकरे यांनी रॉकेल ओतून कल्पना यांना पेटवून दिले.
मुलालाही वाचवले नाही
कल्पना यांच्या शेजारीच असलेल्या आदित्य या त्यांच्या दोन वर्षांच्या मुलालाही ज्वाळांनी घेरले. मात्र, पाषाणहृदयी सासरच्या मंडळींनी त्याचाही जीव वाचवला नाही. कल्पना यांचे वडील बळीराम सलगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक डी. पी. सानप करत आहेत.