आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिंद्रुड येथील विवाहितेचे थेट सीएमना इच्छामरणासाठी पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - तिन्ही मुलीच झाल्याने वंशाच्या दिव्यासाठी विवाहितेचा सासरच्यांनी छळ करूनही पोलिसांनी तक्रार न घेतल्याने माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील विवाहितेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिन्ही मुलींसह इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र पाठवले आहे. दरम्यान, या प्रकाराने खळबळ उडाली असून महिलेच्या पत्राने यंत्रणाही हलली आहे.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड माहेर असलेल्या अनिता विष्णू देवकुळे (रा. डोंबिवली पूर्व, मुंबई, ह. मु. दिंद्रुड) यांचा १७ वर्षांपूर्वी पिंपळगाव येथील विष्णू देवकुळे यांच्यासोबत विवाह झाला. त्यांचा मुंबईत गाद्या बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यांना सोनाली, सिमरन व नम्रता अशा तीन मुली आहेत, तर चौथ्या वेळेला प्रसूती घरी झाल्याने मूल दगावले. तू आमच्या वंशाला दिवा देऊ शकत नाहीस म्हणत अनिता यांचा सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याने सुरुवातीला त्यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली; परंतु काहीच कारवाई झाली नाही. त्यानंतर माहेरी आलेल्या अनिता यांनी दिंद्रुड ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी आपली तक्रार न घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी थेट मुलासाठी आपला छळ होत असल्याने व परिस्थिती हलाखीची असल्याने तिन्ही मुलींसह इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. त्याच्या प्रती जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांना पाठवल्या.

गोऱ्हे एसपींशी बोलल्या
दरम्यान, या प्रकरणात शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांना फोन लावून संबंधित महिलेची तक्रार घेण्याबाबत विचारणा केली आहे. इतरही काही संघटनांच्या नेत्यांनी याबाबत प्रशासनाशी संपर्क करून त्या महिलेला न्याय देण्याची मागणी केली.

पोलिस महिलेच्या घरी
सुरुवातीला तक्रार घेऊन आलेल्या महिलेची तक्रार न घेणाऱ्या दिंद्रुड पोलिसांनी या घटनेला वाचा फुटून वरिष्ठ पातळीवरून हालचाली होत असल्याचे लक्षात येताच थेट अनिता देवकुळेंचे घर गाठत त्यांना पोलिस ठाण्यात येऊन तक्रार देण्याबाबत सांगितले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा नोंद झाला नव्हता.
पुढे वाचा... महिलेशी केले असभ्य वर्तन, पतीला मारहाण
बातम्या आणखी आहेत...