औरंगाबाद - एप्रिलच्या मध्यालाच दुष्काळामुळे पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. पाणीटंचाई व दुष्काळामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याच्या हिरानगर तांडा येथील अनेक कुटुंबांना मुलींची लग्ने करता आली नाहीत. ही घटना ताजी असताना लातूरमधील वीरशैव कक्कया समाज प्रतिष्ठानने तर यंदाचा सामुदायिक विवाह सोहळाच रद्द केला आहे.
वीरशैव कक्कया समाज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी समाजातील गरीब व गरजू कुटुंबांतील उपवर वधू-वरांचे सामुदायिक विवाह लावण्यात येतात. प्रतिष्ठान मागील १३ वर्षांपासून ह उपक्रम राबवत असते. या प्रतिष्ठानने आतापर्यंत सामुदायिक विवाह सोहळ्यात २५० लग्ने लावली आहेत. प्रतिष्ठान दरवर्षी अनेक अडचणींवर मात करून सामुदायिक विवाह सोहळा घेत असते. मात्र, यंदा शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्यामुळे यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. तशा आशयाचे निवेदनच प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जांबुवंतराव सोनकवडे व सचिव गणेश सावळकर यांनी सोशल साइटवर टाकले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लातूर शहर व परिसरात भीषण पाणीटंचाईमुळे वीरशैव कक्कया समाज प्रतिष्ठानच्या वतीने ८ मे २०१६ रोजी घेण्यात येणारा सामुदायिक विवाह सोहळा रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
चार पालकांनी संपर्क साधला
आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी लातूर शहरात सामुदायिक विवाह सोहळा घेतो. दरवर्षी १५ ते २० जोडप्यांचा विवाह सोहळ्यात करण्यात येतो. सर्वात जास्त म्हणजे ३५ जोडप्यांचा विवाह आम्ही या सोहळ्यात केला आहे. यंदाही चार पालकांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात नोंदणीसाठी आमच्याशी संपर्क साधला होता. मात्र, दुष्काळी परिस्थिती व पाण्याच्या दुर्भिक्षामुळे आम्ही त्यांना यंदाच्या सोहळ्याबाबत असमर्थता व्यक्त करून नम्रपणे नकार दिला.
-अॅड. जांबुवंतराव सोनकवडे, अध्यक्ष, वीरशैव कक्कया समाज प्रतिष्ठान, लातूर.
लग्न जमवण्यातही अडचणी
यंदा पाणीटंचाईमुळे लग्न जमवण्यातही अडचणी आल्याचे पालकांनी सांगितले. समाजात गरीब कुटुंबाला लग्नासाठी कपडे व अन्य खरेदीबरोबरच धार्मिक कार्यक्रमालाही पैसे लागतात. या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यासह बीड, उस्मानाबाद, सोलापूर व महाराष्ट्रातील अन्य भागांतूनही सुमारे दहा हजार समाजबांधव येत असतात. त्यांची सोय करणे जिकिरीचे झाले असते. त्यामुळे यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे. शक्य झाले तर दिवाळीत सोहळा घेणार आहे.
-गणेश सावळकर, सचिव, वीरशैव कक्कया समाज प्रतिष्ठान, लातूर.