आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन येणार, डोंजेकरांसाेबत क्रिकेटही खेळणार! तेंडुलकरनेच स्‍वत: व्हिडिओद्वारे दिली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- मास्टर ब्लास्टर, खासदार सचिन तेंडुलकर डोंजा गावाला भेट देण्यासाठी लवकरच येणार आहेत. एवढेच नाही तर ते गावकऱ्यांसोबत क्रिकेटही खेळणार आहेत. खासदार तेंडुलकर यांनीच खुद्द गावकऱ्यांना एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली असून, त्यात त्यांनी गावकऱ्यांना विकासाबद्दल जागरूक होण्याचे आवाहनही केले आहे. 


खासदार तेंडुलकर यांनी परंडा तालुक्यातील डोंजा गाव दत्तक घेतले अाहे. खासदार फंडातून या गावाचा विकास करण्यात येणार आहे. आजवर गावामध्ये झालेल्या विकासकामांबद्दलची मािहती घेण्यासाठी तसेच गावकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी तेंडुलकर यांचा डोंजा दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र हा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने त्यांनी गावकऱ्यांची निराशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना भेटीचे प्रॉमिस देणारा व्हिडिओ खासदार तेंडुलकर यांनी पाठविला असून, त्यात गावकऱ्यांचे तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे कौतुक करण्यात अाले आहे. मुळात खासदार तेंडुलकर यांच्या दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरचा अडथळा आल्याचे सांगण्यात येत आहे. 


तांत्रिक अडचणीमुळे हा दौरा रद्द झाला असला तरी त्यांनी गावाच्या विकासात अधिक लक्ष घातल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी गावकऱ्यांकडून तसेच प्रशासनाकडून गावाच्या विकासासाठी सहकार्य होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची बातमी पसरली होती. गावकऱ्यांना हा निरोप पोहाेचताच गावकऱ्यांनी बैठक घेऊन कामात सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणाही हलली. 


तेंडुलकर यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची व्यापक स्वरूपात बैठकही झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर तेंडुलकर यांनी गावाला भेट देण्याचे निश्चित केले होते. मात्र हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे खासदार तेंडुलकर यांच्या नवीन डोंजा दौऱ्याच्या घोषणेकडे जिल्हाभराचे लक्ष वेधले आहे. 

 

काय म्हणतात खासदार सचिन तेंडुलकर 

खासदार सचिन तेंडुलकर यांनी डोंजेकरांना व्हॉट्सअॅपवरून व्हिडिओ पाठविला असून, त्यात ते म्हणतात, ‘मी, डोंजाबद्दल भरपूर चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. तुम्ही स्वच्छता बाळगलेली आहे आणि अनेक गोष्टींचा प्रयत्न चालू आहे गावाला सुधारण्यासाठी. आणि त्या टीमचा सहभाग मी पण आहे. मी गमे साहेबांचे (जिल्हाधिकारी)अभिनंदन करतो. त्यांची लीडरशिप उत्कृष्ट राहिलेली आहे. नुसती लीडरशिप असून चालणार नाही. लीडरशिपच्या खालीपण आपल्याला एक चांगली सॉलिड टीम पण असणं इम्पॉर्टंट असणार आहे. एक टीमवर्क असणे महत्त्वाचे आहे. आपण सगळे मिळून या गावाला बनवूया. मी पण तुमच्याबरोबर आहे. माझी ट्रीप पोस्टपोन झालेली आहे. पण मी येणार हे नक्की. माझे प्रॉमिस आहे. माझ्या डोक्यात तुमच्याबरोबर क्रिकेटची मॅच खेळण्याची आयडिया पण आहे. मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. गावाला आपण एकत्र बदलूया, मस्तपैकी गाव बनवूया,’ असेही तेंडुलकर यांनी म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...