आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मटकाकिंग पकडला अन् ताकीद देऊन सोडला, दहा वर्षांपासून सर्रास चालू आहे मटका

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - गृहराज्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी पोलिस दलाच्या कामाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर राजरोसपणे सुरू असलेल्या मटक्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर पालकमंत्र्यांनी मटक्यावर धाडी टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी दुसर्‍याच दिवशी लातूरच्या मटकाकिंगला अटक केली अन् प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताकीद देऊन सोडूनही दिले. गुरुवारचा दिवस मटकाकिंगच्या अटकेचा अन् त्याच्या सहजगत्या झालेल्या सुटकेचा ठरला.

पालकमंत्र्यांनी मंगळवारच्या बैठकीत गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगत लातूर पोलिसांचे कौतुक केले होते. बनावट नोटांचा तपासही योग्य दिशेने असल्याचे नमूद करीत पाटील यांनी पोलिसांची पाठ थोपटली होती.

मात्र, पत्रकार परिषदेत मटका आणि अवैध धंद्याचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर पाटील यांनी मटक्यावर कारवाईचे आदेश कायमच दिलेले आहेत, असे उत्तर दिले होते. त्याच्या प्रत्युत्तरात मटका कायम सुरू आणि त्यावर कारवाईचे आदेशही कायमचेच का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी मटक्यावर धाडी टाकण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी दुपारी कपिलनगरमधील बुकीवर धाड टाकून सोपान जाधव याला पकडले. त्याच्या माहितीवरून बाबूराव पाटील ऊर्फ गुरुजी या लातूर जिल्ह्यतल्या मटकाकिंगला ताब्यात घेण्यात आले. मात्र, सोपान जाधववर गुन्हा दाखल झाला. तथाकथित गुरुजीवर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई झाली. त्यांना कोर्टातही हजर करण्यात आले नाही.

पोलिस ठाण्यातूनच जामीन देऊन त्यांना सोडण्यात आले. किरकोळ गुन्ह्यातल्या आरोपींना बेड्या घालून कोर्टात हजर करणार्‍या पोलिसांनी मटकाकिंगला मात्र सहजगत्या सोडून दिले. बाबूराव पाटील हा गेल्या दहा वर्षांपासून लातूर जिल्ह्यातील मटका चालवत आहे. विशेष म्हणजे त्याला अटक दाखवण्यात असली तरी त्याचा जबाबही घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणीही केल्याचे कर्तव्य पोलिसांनी बजावले. विशेष म्हणजे यावर बोलायला एकही वरिष्ठ अधिकारी धजावला नाही.