आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी - मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांच्या प्रशासकीय कारभारावर टीकेचे अस्त्र सोडत महापौर प्रताप देशमुख यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवत विरोधी पक्षाच्या टीकेला स्वत: सामोरे जाण्याऐवजी विरोधकांचाही रोख प्रशासनावरच केंद्रित केला. त्यामुळे संपूर्ण पदाधिकारी, नगरसेवक विरुद्ध मनपा प्रशासन हेच चित्र सभागृहात होते. पदाधिका-यांतील संघर्षाऐवजी प्रशासनाच्याच निष्क्रियतेवर बोट ठेवून आयुक्तांसह सर्व अधिका-यांना कोंडीत पकडले गेले.
महापालिकेची सभा बी. रघुनाथ सभागृहात सकाळी अकरापासून सुरू झाली. आयुक्त सुधीर शंभरकर, उपमहापौर सज्जूलाला, नगर सचिव चंद्रकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभीच मागील सभेचे इतिवृत्त वाचनापूर्वीच शिवसेनेचे गटनेते अतुल सरोदे व उदय देशमुख यांनी यापूर्वीच्या सभांमधून घेण्यात आलेल्या ठरावांवर झालेल्या कार्यवाहीची माहिती सभागृहास देण्यात यावी, अशी मागणी केली. आयुक्तांसह संबंधित विभागप्रमुखांना काही विषयांवर माहिती देता येत नसल्याचे लक्षात येताच महापौर देशमुख यांनी नगरसेवकांना थांबवून स्वत:च प्रशासनावर कडाडून टीका करण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने याच सभेत गैरहजर असलेल्या विभागप्रमुखांची नावे सांगून त्यांनी गैरहजेरीबाबतचे विनंतीपत्र दिले आहे काय, अशी विचारणा केल्यानंतर आयुक्तांनी तसे झाले नसल्याचे सांगितले. यावरूनच महापौरांनी आयुक्तांचा प्रशासनावर वचकच राहिलेला नाही. बंद पडलेली बायोमेट्रिक मशीन दुरुस्त करायला महिनोन्महीने लागतात. अधिकारी-कर्मचा-यांना नोटिसा बजावून उपयोग होणार नाही, आयुक्तांनी अॅक्शन घ्यावी, असे महापौर देशमुख यांनी सुनावले. प्रशासकीय कारभारावर उपमहापौर सज्जूलाला यांनीही जोरदार टीका केली.
दोघांना बाहेर काढले
महापौर प्रताप देशमुख यांनी पाण्याच्या प्रश्नावर निष्क्रिय राहणारे नगर अभियंता (पाणीपुरवठा) यांना बैठकीच्या सुरुवातीसच सभागृहाबाहेर काढत बाहेरच उभे राहण्याचे फर्मान सोडले. त्यापाठोपाठ आठच दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आलेले मालमत्ता विभागाचे प्रमुख शिवाजी देशमुख हेही उशिराने आल्यानंतर त्यांना खुर्चीवरही बसू न देता महापौरांनी थेट बाहेरचा रस्ता दाखवला.
धिक्कार...धिक्कार
अधिकारी-कर्मचारी महापौरांचे ऐकत नसल्याने या प्रशासनाचा आपण जाहीर निषेध नोंदवत असल्याचे महापौर देशमुख यांनी जाहीर केल्यानंतर सभागृहानेही धिक्कार...धिक्कार अशा घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनीही महापौरांच्याच सुरात सूर मिसळून अधिकारी, विभागप्रमुखांपेक्षा प्रशासकीय प्रमुख म्हणून आयुक्तांपासूनच याची सुरुवात करा, असे नमूद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.