आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय महाविद्यालयास क्ष-किरण अभ्यासक्रमाची प्रतीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील क्ष-किरण विभागात आवश्यक यंत्र सामग्री व तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने मागील दहा वर्षांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश एमसीआयने बंद केला आहे. त्यामुळे हा विभाग सलाइनवर आहे. याच विभागासाठी यंत्रसामग्री खरेदीसाठी केंद्र शासनाने 32 कोटींचा निधी मंजूर केला असून त्याचा 25 टक्के वाटा राज्य सरकारने उचलण्याचे सुचवले आहे, परंतु राज्याने हा वाटा अद्याप उचललेला नसल्याने स्वारातीचे त्रांगडे कायम आहे.

स्वाराती रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील क्ष- किरण विभागात एम. आर. आय., डी. एस. ए., अँन्जियोग्राफी यंत्र नसल्याचे तसेच जे उपलब्ध सहयोगी प्राध्यापक आहेत त्यांची पात्रता नसल्याचे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने 2003 मध्ये तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर एम. सी. आय. ने 1 जानेवारी 2004 रोजी अधिष्ठातांना पत्र पाठवून क्ष-किरण विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश बंद करण्यात आल्याचे सांगितले. तसेच अनुभवी व पात्र प्राध्यापकांचे पद रिक्त असल्याने एमबीबीएसच्या 50 विद्यार्थ्यांना कोण शिकवणार, असा प्रश्न उपस्थित करून अभ्यासक्रमाचा प्रवेशही बंद केला आहे. 2004 पासून या विभागात दोन एम. डी. व दोन डिप्लोमा अशा चार अधिकार्‍यांची नियुक्ती अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करून त्यांना तयार करण्यासाठी गेल्या आठ वर्षांत कुणीही पाठपुरावा केला नाही. शल्यचित्सिा विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे क्ष-किरण विभागाचा अतिरिक्त पदभार दिल्यानंतर या विभागाच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे एमसीआयच्या त्रुटींमधील एक सीटी स्कॅन मशीन रुग्णालयास उपलब्ध करून घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने 32 कोटींचा निधी मंजूर केला. यात 75 टक्के केंद्राचा वाटा तर 25 टक्के वाटा राज्य सरकारने उचलायचा आहे. त्यापैकी केंद्राकडून 12 कोटी रुपये स्वारातीला मिळाले आहेत, तर राज्य सरकारने वाटा दिल्यानंतर केंद्र शासन उर्वरित 12 कोटींचा निधी देणार आहे. 32 कोटींच्या निधीतून एमआरआय, डीएसए, अँन्जियोग्राफी यंत्र खरेदी केले जाणार आहे. या खरेदीनंतर एमसीआयकडून तपासणी केली जाईल . या तपासणीनंतर क्ष-किरण विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यास परवानगी मिळणार आहे.