आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संपात शुक्रवारी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) नियुक्त वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले. या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून रुग्णांचे हाल झाले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले असून त्यास नकार दिल्यास संबंधित डॉक्टरांवर कार्यमुक्तीचा बडगा उगारण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 46 आरोग्य केंद्रे व 10 ग्रामीण रुग्णालये व दोन उपजिल्हा रुग्णालये असून बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे साडेपाच हजार रुग्णांची नोंदणी होते. ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. डॉक्टर संपावर गेल्याने आरोग्यसेवा विस्कळीत झाली. ती सावरण्याचा प्रयत्न राष्ट्रीय बालस्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी, बंधपत्रित व आयुषच्या डॉक्टरांद्वारे सुरू होता. यात बालस्वास्थ्य वैद्यकीय अधिकार्‍यांची संख्या मोठी होती. मात्र, तेही या संपात सहभागी झाल्याने आरोग्यसेवा पुरती कोलमडली. ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय झाली. 110 वैद्यकीय अधिकार्‍यांपैकी केवळ 33 डॉक्टर सेवा देत असून आरबीएसके अंतर्गत 58 डॉक्टर संपावर गेल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत असलेले 45 डॉक्टर संपावर गेल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बसवराज कोरे यांनी सांगितले. दरम्यान आरबीएसके डॉक्टरांनी आपल्या संपाबाबत माहिती देण्यासाठी आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना निवेदन दिले.