आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय प्रतिनिधींचा आज देशव्यापी संप, राज्यातील २५ हजार सदस्य सहभागी होण्याचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या तीन फेब्रुवारी रोजीच्या देशव्यापी संपात महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे राज्यातील २५ हजार सदस्य सहभागी होत आहेत. ही माहिती संघटनेचे किशोर गोविंदपूरकर, भरत बेल्लाळे, उनकेश्वर आलमले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
  
देशातील जवळपास २ लाख वैद्यकीय प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारकडील मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी संपात सामील होणार आहेत. वैद्यकीय प्रतिनिधींसाठी असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस टाळाटाळ केली जात असून वैद्यकीय प्रतिनिधींसाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय त्रिपक्षीय समितीची बैठक केंद्रीय कामगारमंत्र्यांनी एकदाही बोलावली नाही. त्यामुळे औषधी कंपनी मालकांची अरेरावी वाढली असून वैद्यकीय प्रतिनिधींना बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकणे, पगार थांबवून मानसिक त्रास देणे, सेल्ससाठी प्रेशर करणे आदी प्रकारे त्रास दिला जात आहे.
  
औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालावी, औषधाच्या व वैद्यकीय उपकरणांच्या किमती अबकारी कर उत्पादनावर असाव्यात, केंद्राने औषधांवर जीएसटी लावू नये आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी दिल्लीत जंतरमंतरवर संघटनेने धरणे आंदोलन केले होते. तथापि, केंद्राने दखल न घेतल्यामुळे आता तीन फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतातील वैद्यकीय प्रतिनिधी व लातूर येथील वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली येथील टाऊन हॉल येथून निघणार आहे.
बातम्या आणखी आहेत...