आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदामातील औषधी, खतसाठा पळवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिंतूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या दोन गोदामांत ठेवलेला औषधी व खतसाठा अज्ञात लोकांनी कृषी अधिकार्‍यांसमक्ष वाहनांतून पळवण्याचा प्रकार शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. याबाबत राजकीय दबाव आल्याने पोलिस ठाण्यात येऊनही कृषी अधिकार्‍याने तक्रार देण्यास टाळाटाळ केली.

औषधी व खतसाठा जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरातील दोन गोदामांत ठेवण्यात आला होता. औषधीसाठय़ाच्या वाटपाचे नियोजनासाठी शनिवारी सर्व मंडळ अधिकारी व कृषी सहायकांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीनंतर लाभार्थी शेतकर्‍यांना औषधींचे वाटप होणार होते. परंतु ज्या शेतकर्‍यांना वाटप होणार नव्हते, अशा शेतकर्‍यांनी गोदामाचे कुलूप उघडताच हातात पडेल ते साहित्य लांबवण्यास सुरुवात केली. सर्व माल शेतकर्‍यांनी लांबवल्यानंतर प्रभारी तालुका कृषी अधिकारी जी.डी.कल्याणकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करीत असताना त्यांना राजकीय पुढार्‍याचा दूरध्वनी आला. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तब्येत चांगली झाल्यानंतर गुन्हा दाखल करू, असे सांगून कल्याणकर निघून गेले.