आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meeting With Chief Minister Devendra Fadnavis For Revenue Divisional Commissioner

मुख्यमंत्र्यांनी उभ्या-उभ्याच ऐकले गा-हाणे, शिष्टमंडळाची घेतली नाही दखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- महसूलचे विभागीय आयुक्तालय लातूरऐवजी नांदेडला स्थापन करण्याचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी लातूर भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
आयुक्तालयाबाबत लातूरकरांच्या भावना तीव्र असून सर्वपक्षीय बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मात्र, त्यात लोकप्रतिनिधींचा समावेश नसल्यामुळे शिष्टमंडळाची फारशी दखलच घेण्यात आली नाही.
नांदेडला महसूल आयुक्तालय स्थापन करण्यासाठीच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने अधिसूचना काढली होती. त्यानंतर लातूरमध्ये सर्वपक्षीय बैठक होऊन त्यात या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. त्या बैठकीत भाजपची नेतेमंडळीही हजर होती. मात्र, एखादे सर्वपक्षीय आंदोलन झाले तर श्रेय काँग्रेसजनांनाच मिळेल याचा अंदाज आल्यानंतर भाजपकडून लातूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या शैलेश लाहोटी यांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी मुंबई गाठली. त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंगळवारची वेळ दिली होती. त्यानुसार दुपारी शैलेश लाहोटी, अप्पा मुंडे, अनिल पतंगे, बाबू खंदाडे आदी भेटण्यास गेले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कक्षात बसून म्हणणे ऐकण्याऐवजी व्हरांड्यात उभ्या-उभ्याच पाच मिनिटांत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. लातूरला सगळ्या सोयी असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आयुक्तालय लातूरलाच व्हायला हवे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे सांगत शिष्टमंडळाला निरोप दिला.
लोकप्रतिनिधी अनुपस्थित
शैलेश लाहोटी हे काँग्रेसमधून, तर अप्पा मुंडे राष्ट्रवादीतून भाजपत आलेले आहेत. ते मूळ भाजपचे नेते नाहीत. मुंबईला जाताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याची कल्पना देण्यात आली नव्हती. भाजपचे लातूर जिल्ह्यातील खासदार सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, आमदार संभाजी निलंगेकर, रमेश कराड यांनाही सोबत घेण्यात आले नाही. खुद्द भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदेही या शिष्टमंडळात नव्हते. ही सगळी मंडळी या शिष्टमंडळात असती तर लातूरच्या शिष्टमंडळाचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी व्हरांड्यात चालता चालता ऐकून घेण्याऐवजी कक्षात बसून ऐकले असते.
लातूरला दुसरे आयुक्तालय करा
नांदेडला आयुक्तालय झाले तर उत्तमच. परळी-अंबाजोगाई आणि उदगीरला जिल्ह्यांचा दर्जा देऊन त्यासह लातूर, उस्मानाबादसाठी नवे आयुक्तालय लातूरला करावे. मराठवाड्यात तीन आयुक्तालये झाली तर काय बिघडले. शेवटी लोकांची सोय महत्त्वाची आहे. लातूर की नांदेड असा वाद करत राहण्यात काही अर्थ नाही. त्यात दोन्ही जिल्ह्यांचे नुकसानच आहे. आपसात लढाई करून जिंकले तरी त्याचा उपयोग नाही. त्यामुळे ही मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
सुनील गायकवाड, खासदार, लातूर