नांदेड- मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. शासन आठवडाभरात दुष्काळाची घोषणा करणार आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाचा मुकाबला करण्याशिवाय अन्य पर्यायही नाही. पुढील वर्षीही हीच परिस्थिती कायम राहणार असून पुन्हा एकदा दुष्काळाचा मुकाबला करण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी शुक्रवारी दै. "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
यंदा थंडीचे आगमन विलंबाने झाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले. किमान तापमान २२ सें. पासून १६ सें. पर्यंत खाली घसरले. दोन महिन्यांपू्र्वी बंगालच्या उपसागरावर आलेले हुदहुद चक्रीवादळ आणि नंतर दोन वेळा अरबी समुद्रावर आलेल्या चक्रीवादळामुळे थंडीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकले नाही. अरबी समुद्रावर आलेल्या चक्रीवादळासाठी पू्र्व हिमालयाकडून ढगांचा ओघ सुरू राहिल्याने मध्य भारतात पाऊस झाला. आता ती स्थिती राहिली नसल्याने थंडी सुरू झाल्याचे औंधकर यांनी सांगितले.
सातत्याने दुष्काळ
मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ आहे. या वर्षी २२ फेब्रुवारी ते १० मार्चच्या दरम्यान या भागात गारपिटीसह वादळी पाऊस झाला. त्यामुळे पावसाळा लांबला. पावसाचे प्रमाणही अत्यल्पच राहिले. परिणामी, दुष्काळाचा मुकाबला करण्याची वेळ आली. दुष्काळाचे दुष्टचक्र मराठवाड्याची पाठ सोडण्यास तयार नाही असेच काहीसे चित्र दिसत आहे.
नीचांकी थंडी
काश्मीर, हिमाचलच्या खोऱ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने त्या भागात सध्या नीचांकी थंडी पडणे सुरू आहे. एरवी थंडीत या भागात तापमान -२ सें. असते. ते आता -९ पर्यंत खाली घसरले आहे. यासोबतच पश्चिमी विक्षेपाचे चित्र पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर निर्माण होत आहे. येणाऱ्या काळात त्याची दिशा पूर्वेकडे सरकत पंजाब, हरियाणा, काश्मीरमार्गे ते देशात दाखल होणार आहे.
जानेवारी-फेब्रुवारीत गारपिटीची शक्यता
पश्चिमी विक्षेपाचा परिणाम व त्याचे प्रमाण पाहता या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षीही जानेवारीच्या व फेब्रुवारीच्या मध्यात राज्यात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या गारपिटीचा व पावसाचा परिणाम पुढील वर्षीच्या पावसाळ्यावर होणार असून पावसाचे प्रमाण पुढील वर्षीही कमी राहणार आहे. जवळपास या वर्षीप्रमाणेच काहीसे चित्र पुढील वर्षीही पाहावे लागण्याची शक्यता औंधकर यांनी व्यक्त केली.