आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mid Day Meal Not Ready Without Chef In Nanded District

नांदेड जिल्ह्यात आचा-यांअभावी पोषण आहार ‘शिजेना’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - गरीब विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळी शाळेत पोषक आहार मिळावा या हेतूने केंद्र शासनाने शालेय पोषण आहार ही योजना सुरू केली, परंतु विद्यार्थ्यांना जेवणासाठी ताट-वाटी, स्वयंपाकासाठी आचारीच नसल्याने या योजनेची वाट लागण्याची वेळ आली आहे. स्वयंपाकाच्या कामाला गुरुजींनाच जुंपल्यामुळे शिक्षणाचेही तीनतेरा वाजत आहेत.

या योजनेंतर्गत तीन वर्षांत शासनाने भांडी, कप्प्याचे स्टील ताट, ग्लास पुरवण्याचे आदेश काढले आहेत; परंतु अद्याप ते शाळेला पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नसल्याच्या अनेक शाळांच्या तक्रारी आहेत. अनेक शाळा ताटांपासून वंचित आहेत. ज्या शाळांना हे साहित्य मिळाले तेदेखील विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अपुरे आहे. त्यामुळे विद्यार्थी ताट-वाट्या घरूनच दप्तरात आणत आहेत.

वह्या-पुस्तकांचे ओझे, त्यात कोंबलेली ताट-वाटी यामुळे दप्तरे फाटून त्यांची लक्तरे होत आहेत. एका वर्षात दोन - तीन दप्तरे घ्यावी लागत असल्याच्या पालकांच्या व्यथा आहेत. बाजारात दप्तरांची किंमत भरमसाट वाढली आहे. हे परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागातील असंख्य गरीब विद्यार्थी तर वह्यांची पाने फाडून त्यावरच मध्यान्ह भोजन घेत असल्याचे वास्तव आहे.

पोषण आहार ही योजना सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तसेच अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांना ही योजना लागू आहे. शाळेतच पोषण आहार शिजवणे अभिप्रेत आहे; पण 800 ते 1000 विद्यार्थी संख्या असलेल्या काही शाळाही किचनशेडविना आहेत. त्यामुळे शाळेच्या एका खोलीला स्वयंपाकघराचे स्वरूप प्राप्त झालेले दिसून येते. अनेक शाळांनी आपल्या सोयीप्रमाणे स्वयंपाक शिजवण्याची तजवीज केली आहे. कित्येक शाळांत तर टीनपत्र्यांचे तकलादू शेड उभारून किंवा उघड्यावरच पोषण आहार शिजवला जातो. त्यामुळे तो किती पोषक आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

मे. वैद्य इंडस्ट्रीजकडून पुरवठा
शासनाने 2009, 10 आणि 12 मध्ये स्वयंपाकाला लागणारे साहित्य, विद्यार्थ्यांसाठी कप्प्याचे ताट आणि पाणी पिण्यासाठी ग्लास पुरवण्याचे आदेश काढले. वेगवेगळ्या संस्था, व्यावसायिक कंपन्यांना ही कंत्राटे दिली गेली. साहित्य कोणत्या तालुक्याला किती
पुरवावे याचा निर्णय शासनस्तरावरच घेण्यात आला. त्यानुसार सप्टेंबर 2009 मध्ये जिल्ह्यातील किनवट, माहूर, बिलोली, उमरी, धर्माबाद व मुदखेड या सहा तालुक्यांत एकूण 35 हजार 385 ताटे नागपूरच्या मे. वैद्य इंडस्ट्रीजकडून
पुरवण्यात आली.

गुरुजीच बनले आचारी
पोषण आहार शिजवण्यासाठी दर 100 विद्यार्थ्यांमागे एक आचारी ठेवण्याचे निर्देश घालून देण्यात आले आहेत. त्यासाठी सरासरी एक हजार रुपये महिना मोबदला त्याला पडतो. विशेष म्हणजे बाजारात पुरुषाला दरदिवशी 200 रुपये, तर महिलांना 150 रुपये मजुरी आहे. एक हजार रुपयांत कोणत्याही कुटुंबाने कशी गुजराण करावी, हे शासनातील धुरीणच जाणोत. परवडावे म्हणून एखादा आचारी 200 मुलांचा स्वयंपाक करण्याची तयारी दर्शवत असला तरी शासनाला ते मान्य नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनही त्या भानगडीत न पडता गुरुजींनाच आचारी म्हणून स्वयंपाकास जुंपण्यात येते. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो.
साहित्य अपुरे आहे
शालेय पोषण आहार योजनेसाठी शासनाकडून जे साहित्य आले ते विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. ते अपुरे आहे हे नाकारता येत नाही. शासनाकडून अजून साहित्य आले तर ते त्वरित वाटप करू.’’
एकनाथ मडावी, शिक्षणाधिकारी, नांदेड