आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑन द स्पॉट रिपोर्ट: रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, मंत्री लोणीकर यांच्या मतदारसंघातील चित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर - परतूर तालुक्यातील येनोरा गावात पाणीटंचाई ही ग्रामस्थांतील वादाचे मुख्य कारण ठरत आहे. पाण्याचा इतर कुठलाही स्रोत शिल्लक नसल्याने गावात टँकर आले की युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. त्यात पुन्हा सर्वांना पाणी मिळाले नाही की वाद टाळणे अशक्यच. अनेकदा या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याचे गावकरी सांगतात. पाण्यासाठी रोजच होणाऱ्या धावपळीमुळे वैतागलेले काही ग्रामस्थ स्थलांतराच्या विचारापर्यंत पोहोचले आहेत.

परतूरपासून १२ किलोमीटर अंतरावरील येनोरा या गावाची लोकसंख्या २ हजार १०० इतकी आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मतदारसंघातील हे गाव. गावात प्रवेश करताच प्रत्येक घरासमोरील बैलगाडीत ठेवलेली पाण्याची टाकी टंचाईच्या तीव्रतेची जाणीव करून देत होती. गावात पाणीपुरवठ्याची कोणतीही शासकीय योजना सुरू नाही. १५ वर्षांपूर्वी सुरू झालेली एक योजना सात वर्षांपासून बंद आहे. सद्य:स्थितीत पूर्ण गावासाठी पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत म्हणजे गावाच्या पूर्वेला असलेली जुनी सार्वजनिक विहीर. गावातील जवळपास सर्वच जलस्रोत कोरडे पडल्याने २१ जानेवारीपासून गावाला टँकर सुरू झाले. टँकरचे पाणी या विहिरीत सोडले जाते. त्यांनतर खरी धावपळ सुरू होते. या ठिकाणी पोहऱ्यातून पाणी शेंदण्यासाठी महिला, शाळकरी मुलींची चढाओढ लागते. जो- तो पाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो.

अनेकदा या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर पोहरा टाकण्यासाठी जागा नसल्याने वादाची परिस्थिती निर्माण होते. एका टँकरने केला जाणारा पुरवठा गावाला पुरेसा ठरत नाही. त्यामुळे टँकर येताच घरातील प्रत्येक सदस्याला हातातील काम सोडून विहिरीवर पळावे लागते. पशुपालक तर पाणी, चारा या दुहेरी संकटात अडकले आहेत. चारा, पाणी दोन्हीही मिळत नसल्याने नाइलाजास्तव पशुधन कमी किमतीत विकावे लागते आहे. अशा परिस्थितीमुळे स्थलांतर करण्याची विचार
ग्रामस्थांच्या मनात जोर धरत असल्याचे त्यांचाशी बोलताना जाणवते.

दुष्काळाचे दुष्टचक्र
पाणी नसल्याने गावात रोजगार नाही. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. दोन पैसे हाताशी आले नाही तर खायचे काय, हा प्रश्न आहे. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेले ग्रामस्थ स्थलांतराच्या विचारापर्यंत पोहोचले आहेत.
सुरेश भुंबर, गावकरी, येनोरा, ता.परतूर.

योजनेसाठी प्रस्ताव पाठवला
पाणीटंचाई निवारणासंदर्भात नवीन योजना गावात राबवण्यात याव्यात यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. पण अद्याप याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
कैलास साळवे, सरपंच, येनोरा