आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Khadse Take Review Of Drought Work In Latur, Beed, Osmanabad

खडसे घेणार लातूर, बीड, उस्मानाबाद येथील दुष्काळी कामाचा आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - महसूलमंत्री एकनाथ खडसे शुक्रवारी लातूरच्या दौऱ्यावर येत असून रेल्वेने पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या व्यवस्थेची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि लातूर-बीड-उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तिन्ही जिल्ह्यांत सुरू असलेल्या दुष्काळी कामाचा आढावा ते घेणार आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री १५ एप्रिल रोजी रेल्वेने पाणीपुरवठ्यासंदर्भात मध्यान्ही १२.३० वाजता लातूर रेल्वेस्थानकास भेट देणार असून त्यानंतर शासकीय रेस्ट हाऊस, लातूर येथे विभागीय आयुक्त व लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. लातूर शहराला मंगळवारपासून रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे. पाच लाख लिटर क्षमतेचे टँकर घेऊन आलेल्या तीन रेल्वे आतापर्यंत लातूरमध्ये पोहोचल्या आहेत. राज्यात पहिल्यांदाच एखाद्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. लातूरमध्ये मंगळवारी यशस्वीपणे या कामाला प्रारंभ झाला असला तरी एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने या कामाची पाहणी केलेली नाही. त्यामुळेच ज्यांच्या पुढाकारामुळे पाण्याची रेल्वे सुरू झाली ते महसूलमंत्री एकनाथ खडसे स्वत: या कामाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी लातूरमध्ये येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत लातूर, बीड, उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार असून विभागीय आयुक्तही या वेळी उपस्थित राहणार आहेत.

दहा दिवसांत३२ एमएलडी पाणी आणले
१ ते ११ एप्रिल दरम्यान डोंगरगाव येथून ९५९ तर माळकुंजी येथून ४९१ टँकर फेऱ्यांच्या माध्यमातून ३२ एमएलडी पाणी आणण्यात आले. शुद्धीकरण करून शहरात वितरित करण्यात आले आहे. तसेच भंडारवाडी व साई येथूनही काही प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात आल्याचा दावा पालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

मनपाने आवाहन केले तरी टँकरचे दर चढेच
दरम्यान, लातूर शहरासाठी रेल्वेने पाणी आल्यानंतरही शहरातील पाणीपुरवठा अद्याप सुस्थितीत आलेला नाही. खासगी टँकरचे दर १ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. खासगी टँकरचालकांची मनमानी महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाला रोखता आलेली नाही. महापालिका केवळ पत्रके काढून टँकरचे दर कमी करण्याचे आवाहन करीत आहे. ठोस कृती अद्याप झालेली नाही. त्यामुळे टँकरचालकांची मनमानी वाढत आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी ३५० रुपयांना खासगी टँकर विकावेत, असे आवाहन महापालिकेने केले होते. आता महसूलमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा टँकरचे दर नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.