आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तधनाचे गौडबंगाल, पोलिसांनी सुरू केली मजुरांची चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज/बीड - गढीच्या खोदकामात पिवळे फडके गुंडाळलेला तांब्या सापडला खरा; पण जागामालकाने तांब्यात बनावट कर्णफुले असल्याचे सांगून मजुरांची दिशाभुल केली. हा प्रकार केज तालुक्यातील साळेगाव येथे उघडकीस आला असून गुप्तधनाच्या संशयावरून पोलिसांनी चौकशीसाठी तीन मजुरांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रार कोणी द्यावी, यात पोलिस व महसूल विभागाच्या अधिका-यांत ताळमेळ नसल्याने रविवारी संध्याकाळपर्यंत गुन्हाच दाखल झाला नव्हता.

केज तालुक्यातील साळेगाव येथील सय्यद ख्वाजा सय्यद रशीद याने गावातील सय्यद मोबीन सय्यद इक्बाल याच्याशी जागेचा व्यवहार केला. या जागेची इसार पावतीही झाल्याने सय्यद मोबीन याने गढीचे खोदकाम सुरू केले. शनिवारी दुपारी गढीची माती खोदून शेतात टाकण्यासाठी ट्रॅक्टर व तीन मजूर कामावर लावण्यात आले. खोदकाम सुरू असताना दुपारी दोन वाजता वचिष्ठ इंगळे, दत्ता राऊत, मधुकर गालफाडे या तीन मजुरांना एका पिवळ्या फडक्यात गुंडाळलेला तांब्याचा तांब्या हाती लागला. मजुरांनी हा तांब्या जागेचे मालक सय्यद मोबीन यांच्या हाती दिला. तेव्हा मोबीन यांनी बोबाटा करू नका, असे बजावत या तांब्यात जे काही असेल ते मी तुम्हाला देईल, असे मजुरांना सांगितले.

खोदकाम झाल्यानंतर सायंकाळी घरी परतण्याची वेळ झाली तेव्हा मजुरांनी पुन्हा एकदा त्या तांब्यात काय निघाले अशी विचारणा मोबीन यांच्याकडे केली. तेव्हा मोबीन यांनी घरात ठेवलेला तांब्या बाहेर आणून मजुरांना दाखवला. तांब्यात बेनटेक्सची कर्णफुले असल्याचे मजुरांनी पाहिले. या तांब्यात दुसरे काहीच नव्हते. फक्त कर्णफुलेच होती, असे मोबीन याने मजुरांना सांगून थाप मारल्याने गौडबंगाल वाढले आहे.

तक्रारीसाठी पोलिस, महसूल प्रशासनात तू तू-मैं मैं
केज तालुक्यातील साळेगावात गुप्तधन सापडल्याची चर्चा थेट तहसील विभागाच्या कानावर गेल्याने नायब तहसीलदार दादासाहेब बोराडे, मंडळ अधिकारी भागवत पवार, तलाठी सुहास डोरले, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव यांनी रविवारी गावाला भेट देऊन पंचनामा करत तांब्या ताब्यात घेतला. याप्रकरणी जागामालकाची पोलिसांकडून सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तरच या प्रकरणातील सत्य समोर येईल, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.

वादावादीमुळे प्रकार चव्हाट्यावर
मातीचे खोदाकाम करताना सापडलेल्या तांब्यातील गुप्तधन वाटण्यावरून जागामालक व मजुरांत तणातणी झाली. खोदकामाच्या वेळी तांब्या हाती लागला तेव्हा मजुरांनी पिवळा कपडा हटवला. तांब्यात गुप्तधन असल्याचे दिसून आले गुप्तधनाची चर्चा झाल्याने हिस्सेकरी वाढले. वाटणीच्या वादामुळे प्रकार उजेडात आला दरम्यान, महसूल विभागाच्या अधिका-यांनी मजुरांसह जागामालकाचे जबाब घेतले असून जबाबात तफावत आढळली. सापडलेल्या तांब्यात बनावट कर्णफुले सापडली, असे सय्यद इक्बाल याने सांगितले. मात्र, तांब्यात गुप्तधन असल्याचे मजुरांनी सांगितले. जागा मालक आणि मजुरांच्या जबाबातील विसंगतीमुळे महसूल अधिका-यांनी सापडलेला तांब्या जप्त केला.

महसूल विभागाने तक्रार द्यावी
साळेगाव येथे सापडलेल्या गुप्तधन प्रकरणाची चौकशी करणे ही महसूल व पुरातत्त्व विभागाच्या आखत्यारितील बाब आहे.त्यांनी चौकशी करून याप्रकरणी रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर कारवाई करण्यात येईल; परंतु यासाठी विभागाने आमच्याकडे तक्रार देणे गरजेचे आहे.''
डी. बी. जाधव ,पोलिस उपनिरीक्षक, केज

ही पोलिसांची जबाबदारी
प्रथमदर्शनी या तांब्यातील गुप्तधन काढून त्यात बनावट कर्णफुले टाकण्यात आल्याचे निदर्शनास येते. महसूल विभागाने नोंदवलेल्या जबाबात ही बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी ज्या अर्थी मजुरांना ताब्यात घेतले आहे त्या अर्थी या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई केली पाहिजे.''
भागवत पवार, मंडल अधि कारी, केज