आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेचे वेध: आमदार देशमुखांचे प्रथमच लागले कचरा डेपोला पाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा, भरून वाहत असलेले दुभाजक आणि कचरा डेपोवर लागलेले ढीग या पार्श्वभूमीवर आमदार अमित देशमुख यांनी बुधवारी पहिल्यांदाच नांदगाव येथील कचरा डेपोला भेट दिली. शहरातील रस्त्यांवरचा कचरा उचलून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे, कचरा डेपोवरील ढीग हटवणे आणि कचर्‍यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पावले उचलणे ही कामे महापालिकेने प्राधान्याने करावीत, अशी सूचना त्यांनी या वेळी केली. तसेच विकास सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शहरातील कचरा उचलणे आाणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम मोफत करून देण्याची तयारी देशमुख यांनी दाखवली. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रस्त्यावर पडलेल्या कचर्‍यामुळे लातूरकर आणि साचलेल्या ढिगामुळे नांदगाव-वरवंटी येथील ग्रामस्थ, असा हा दुहेरी पेच आहे. लातूरमध्ये साधारण 150 टन कचरा दररोज तयार होतो. मात्र, महापालिकेची यंत्रणा जास्तीत जास्त 100 टन कचरा उचलू शकते. गेल्या दहा वर्षांपासून नांदगावमध्ये असलेल्या डेपोवर कचर्‍यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प आहे. मात्र, तो बंद असल्यामुळे तेथे कचर्‍याचे 100 फूट उंचीचे ढीग साचले.
परिणामी नांदगाव, वरवंटी, बसवंतपूर येथील ग्रामस्थांचे जिणे मुश्कील झाले. त्यांनी कचरा टाकू देण्यास मनाई केली. आंदोलने झाली. तरीही प्रश्न सुटत नसल्याचे पाहून नांदगाव येथील अमोल पवार यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात तक्रार केली. तेथे सुनावणी होऊन महापालिकेला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर महिनाभरापूर्वी खतनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला. तेथे दररोज 100 टन कचर्‍याची विल्हेवाट लावली जात आहे, असे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. मात्र, तेथे उपस्थित ग्रामस्थांनी याला आक्षेप घेतला.
खतनिर्मिती प्रकल्प बंद असतो, अशी तक्रार त्यांनी केली. आमदारसाहेब, काहीही करा, पण लातूरचा कचरा इथं टाकू नका, आम्हाला फार त्रास होतोय, या शब्दांत ग्रामस्थांनी भावना मांडल्या. आमदार देशमुखांनी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी खतप्रकल्प आणि डेपोवर साचलेल्या ढिगांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कचर्‍यावरील तोडगा दृष्टिपथात असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्षे हा प्रश्न चर्चीला जात असताना आपण डेपोला कधी भेट दिली नाही. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन तुम्ही पहिल्यांदाच कचरा डेपोवर आलात, या प्रश्नावर त्यांनी तोडगा काढायला आलो असल्याचे उत्तर दिले.
दरम्यान, आमदार अमित देशमुख यांनी साई बंधार्‍याला भेट दिली. तेथे उपलब्ध असलेले पाणी आणि मांजरा धरणातून उपसा होण्यार्‍या पाण्याची त्यांनी माहिती घेतली. शहराला 15 जूनपर्यंत पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याचे या वेळी महापालिका आयुक्त तेलंग यांनी सांगितले.
सीएसआर फंडाचा वापर करणार
लातूर शहरातील कचरा उचलणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम विकास सहकारी साखर कारखान्यामार्फत करण्याची तयारी आमदार अमित देशमुख यांनी दाखवली. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून हे काम करता येईल, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. तो महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतल्यानंतरच हे काम सोपवता येईल. मात्र, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही.
लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी बुधवारी कचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली.

निवडणुका जवळ आल्या म्हणून..
कचर्‍याचा प्रश्न तीन वर्षांपासून तीव्र झाला आहे. डेपोशेजारी असलेल्या आमच्या शेतात बसून जेवण करणे शक्य नाही. मजूर कामाला येत नाहीत. कचर्‍याचे पाणी पाझरून जमिनीत मुरले, त्यामुळे भूजल प्रदूषित झाले आहे. वारंवार विनंत्या करूनही काहीच झाले नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका कामाला लागल्यासारखे दाखवत आहे. आमदारांचे डेपोवर येणे हा निवडणुकांच्या तोंडावरचा स्टंट आहे. अमोल पवार, ग्रामस्थ आणि याचिकाकर्ते, नांदगाव
आमदार, महापालिका अन् बेडूक
कचरा डेपोवरून आमदार थेट महापालिकेत आले. महापौर स्मिता खानापुरे यांच्या कक्षात त्यांनी आयुक्तांशी कचरा प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच त्यांच्या मागील टेबलावर अचानक एक बेडूक अवतरला. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिकेचे प्रमुख असलेल्या महापौरांच्या दालनात बेडूक पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ते त्यांनी आयुक्त, पत्रकारांना दाखवले. त्यानंतर शिपाई धावत आला आणि त्याने शिताफीने बेडकाला अलगद पकडले. त्या बेडकाला महापालिका आवाराच्या बाहेर नेऊन सोडा, अशी सूचना अमित देशमुख यांनी केली.