आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांशी बेइमानी कराल तर छाताडावर नांगर चालवू; आमदार बच्चू कडूंचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- सरकारने कर्जमुक्तीचे गाजर दाखवून प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूकच करण्याचे काम केले आहे. परंतु छत्रपतींच्या नावाने योजना देऊन शेतकऱ्यांशी बेइमानी कराल तर मुख्यमंत्रीच काय, आमदारही होऊ देणार नाही. शेतकरीच सरकारच्या छातीवर नांगर चालविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी बुधवारी (दि. १९) येथे दिला. सरकारची कर्जमाफी म्हणजे घरात हातभट्टी व दरवाजावर अगरबत्ती, अशा प्रकारची असल्याची टीकाही  आ. बच्चू कडू यांनी केली.  

शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने येथील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात आयोजित एल्गार मेळाव्यात बोलताना आ. बच्चू कडू यांनी राज्य व केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर उपस्थित होते. मंचावर रघुनाथदादा पाटील, अशोक ढवळे, निमंत्रक डॉ. अजित नवले, किशोर ढमाले, सुभाष काकुर्ते,  करण गायकर, किशनराव गुजर, बन्सी सातपुते, कॉ. विलास बाबर, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, आ. विजय भांबळे, राजन क्षीरसागर आदी उपस्थित होते. मेळाव्याची सुरुवात निकिता कदम या मुलीच्या भाषणाने झाली. 

परभणी जिल्हा सुकाणू समितीच्या वतीने मंचावर सर्व शेतकरी नेत्यांना ‘रुमणे’ भेट देण्यात आले. या वेळी संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.  या वेळी रघुनाथदादा पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सत्तेवर आल्यावर या सरकारने एक वेगळी चाल चालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकरी आता पूर्णतः फसले असून संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत, असा इशारा दिला. जनतेच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न तीव्र होत असताना बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग यासारख्या बाबी सरकारला महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली.  

देशात शेती अवजाराचे भाव वाढत असले तरी शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे स्वामिनाथन आयोग लागू करून उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा दिला पाहिजे. येत्या २३ तारखेला पुणे येथे सुकाणू समितीच्या जनजागृती अभियानाचा समारोप होणार आहे, असे त्यांनी सांगितले.  प्रास्ताविक रसिका ढगे यांनी केले, तर अध्यक्षीय भाषणात वरपुडकर यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या धोरणावर टीका करीत पती-पत्नीच्या नावावर कर्ज असेल तर एकाला कर्जमाफी मिळेल हाच निकष शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देताना लागू होईल का, असा प्रश्न उपस्थित करून शेतीमालाला रास्ता भाव दिला पाहिजे, अशी मागणी केली.   या वेळी डॉ. अजित नवले, करण गायकर, अशोक ढवळे, किशोर धमाले, कालिदास आपेट, आ. विजय भांबळे यांची भाषणे झाली.
बातम्या आणखी आहेत...